Manwath Murders Webseries INSTAGRAM
मनोरंजन बातम्या

Mistry Behind 'Manwath Murders' Case : ४ ऑक्टोबरला येणारी 'मानवत हत्याकांड' वेबसिरिज नेमकी आहे तरी काय ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Story Of Manwath Murders : आशिष बेंडे दिग्दर्शित तसेच महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारेंनी निर्मित केलेल्या 'मानवत हत्याकांड' या वेबसिरीजचा ट्रेलर मंगळवारी रिलीज करण्यात आला आहे. ४ ऑक्टोबरला सोनी लाइव्ह ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या या वेब सिरीजमध्ये आशुतोष गोवारिकर, मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, किशोर कदम सारखे दिग्गज कलाकार विविध भूमिका सकरताना बघायला मिळणार आहेत.

या सीरीजच्या निमित्ताने महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण देशाला हादरवणाऱ्या या मानवत हत्याकांडाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. जादूटोणा, काळाजादूच्या अघोरी कृत्यातून ११ स्त्रियांचे झालेले खून मन हेलावणारे होते. नोव्हेंबर १९७२ ते जानेवारी १९७४ मध्ये घडलेल्या महाराष्ट्राला ज्ञात असलेलं हे एवढं घृणास्पद असं पहिलं 'सीरिअल किलिंग' प्रकरण होतं. ते नेमक कसं घडलं? त्याच गूढ कसं उकललं? कोण होता सूत्रधार? गुन्हेगारांना शिक्षा झाली का? हत्याकांडानंतर खून खटलाही गाजला, नेमक हे प्रकरण काय आहे, त्याची रंजक माहिती जाणून घेऊया.

छिन्नविच्छिन्न मृतदेहांचे गूढ ..

मराठवाड्यातल्या एका गावातून एका मागोमाग एक लहान मुली आणि बायका गायब होऊ लागल्या. त्यांचे छिन्नविच्छिन्न मृतदेह शेतात, विहिरीवर, वावरात सापडू लागले आहेत, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. हा काळ होता १९७३ - ७४ चा. कोणाच्या गुप्तांगावर जखमा होत्या, कोणाची बोटं छाटलेली होती, तर कोणाच्या छातीचा भाग काढून घेतलेला होता. एका चिमुकलीच शिर छाटून टाकलेलं होतं. हे क्रूर कृत्य घडल होतं परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील मानवत गावात.

एका मांत्रिकाच्या सल्ल्यावरून हे सर्व खून नोव्हेंबर १९७२ ते जानेवारी १९७४ दरम्यान करण्यात येत होते. या काळात अचानकच गावातल्या महिला आणि मुली एकामागोमाग एक गायब व्हायला लागल्या. त्यांचे छिन्नविच्छिन्न मृतदेह विहिरीत, शेतात सापडायला लागले.

विशेष म्हणजे पहिले ६ खून झाले, तोपर्यंत याच्या मागे नेमकं कोण आहे? याचा काहीच तपास लागलेला नव्हता. गुप्तधानाची लालसा आणि मूल होत नसल्याने लोक वांझ म्हणत असल्याचा राग मनात धरून मूल व्हाव या हव्यासाने बंद पडलेली मासिक पाळी सुरू करण्यासाठी मांत्रिकाची मदत घेतली गेली होती.

पंधरा दिवसाच्या अंतराने गयाबाई गच्छवे आणि शकिला अल्लाउद्दीन या २ चिमुकल्या मुलींचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत गावातल्या उत्तमराव बारहाते याच्या शेतानजीक आढळला. मात्र या दोन्ही गरीब घरातल्या असल्याने त्यांच्या खुनाचा तपास म्हणावं तसा वेगाने होत नव्हता. फेब्रुवारी महिन्यात ३५ वर्षांच्या सुगंधा मांगचा संशयास्पद मृत्यू झाला. खुना मागचे गूढ उकलायला तयार नव्हते, अशातच एप्रिल महिन्यात पुन्हा १० वर्षांच्या नसीमा करीमचा खून झाला. तिच्या गुप्तांगावर जखमा होत्या, शिर छाटलेले होते, मृतदेहाची पूर्ण विटंबना करण्यात आली होती.

या नंतर मात्र पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. खून झालेल्या स्त्रियांच्या मृतदेहांची अवस्था पाहता या हत्याकांडामागे काळी जादू, नरबळी वगैरेसारखा प्रकार असण्याचा पोलिसांचा संशय होता. त्या दृष्टीने तपास सुरू झाला.

खूनांच्या मालिकेचा नाट्यमय थरार

अखेर १८ जून १९७३ ला उत्तमराव बारहाते, रुक्मिणी भागोजी काळे, भागोजी काळे, दगडू भागोजी काळे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शेती, मोठा व्यापार आणि मोठा वाडा असलेला उत्तमराव बारहाते गावात नगराध्यक्ष होता. हातभट्टीचा व्यवसाय करणाऱ्या रुक्मिणी काळेच्या प्रेमात पडला. तिच्यासाठी उत्तमरावने वेगळा वाडा देखील विकत घेतला. पोलिसांना त्यांच्या नात्याची आणि व्यवसायाची कल्पना होती. संशयित म्हणून इतर दोघांसह हे ताब्यात होते. मात्र असे असतानाही गावात ३२ वर्षीय कलावतीचा खून झाला आणि तिच्याही मृतदेहाची विटंबना केलेली होती. त्यामुळे यामागे नरबळी, काळीजादू असा काही प्रकार असण्याची शंका अधिक होती.

गावातल्या खुनाची मालिका थांबत नव्हती, अजून एका १० वर्षांच्या चिमूकलीचा खून झाला होता आणि अद्यापही पोलिसांच्या हाती कोणतेच मुख्य धागेदोरे लागले नव्हते. दरम्यान अटकेनंतर दीड महिन्याच्या आत 30 जुलै 1973 ला उत्तमरावांसह चौघांची जामिनावर सुटका झाली होती. हत्यांचं सत्र थांबलं नव्हतं. विधानसभेत त्याविषयी पडसाद उमटले.

तत्कालीन गृहमंत्री शरद पवार यांनी यात लक्ष घालत मुंबईहून सीआयडी आणि इतर वरिष्ठ अधिकारी मानवतला पाठवले गेले. दरम्यान, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोंडिबा रिळे नावाच्या इसमाचा खून झाला होता. पुढे डिसेंबरमध्ये पोलीस उपअधीक्षकांनी समिंदरी नावाच्या रुक्मिणी काळेच्या बहिणीला कोंडिबा रिळेच्या हत्येच्या संशयावरून अटक केली आणि तिथून गूढ उकलायला सुरुवात झाली.

या हत्याकांडातील शेवटचे तीन खून ४ जानेवारी १९७४ रोजी एकाच दिवशी झाले. एकाच कुटुंबातील तिघींची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. मात्र यावेळी हे खून उमाजी पितळे नावाच्या एका इसमाने पाहिले होते. हाच एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पुढे मानवत खून खटल्यात महत्त्वाचा दुवा ठरला.

४ जानेवारीला झालेल्या तिहेरी खुनाच्या दोनच दिवसानंतर गणपत साळवे या मांत्रिकाला बारामतीहून अटक झाली. त्याने दिलेल्या कबुलीजबाबातून हत्याकांडाचा हेतू आणि डाव सगळंच उकललं.

अन् पुराव्या अभावी सुटका..

दोन्ही माफीच्या साक्षीदारांनी दिलेल्या कबुलीजबाबातून उत्तमराव बारहाते आणि रुक्मिणी काळे यांनी पुत्रप्राप्तीसाठी आणि गुप्तधन मिळण्याच्या हेतून हे खून करवून घेतल्याचं स्पष्ट झालं. या साक्षीदारांचं कथन ग्राह्य धरत जिल्हा सत्र न्यायालयाने २० नोव्हेंबर १९७५ रोजी या बहुचर्चित खटल्यावरचा निकाल दिला. उत्तमराव आणि रुक्मिणी यांच्याच सांगण्यावरून हत्या झाल्या. म्हणून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याबरोबर प्रत्यक्ष मारेकरी असलेल्या सोपान थोटेलाही फाशीची शिक्षा सुनावली गेली. दगडूसह इतर चार साथीदारांना जन्मठेप झाली.

उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या शिक्षेत आणखीही बदल केले. दगडू काळे, देव्या चव्हाण, सुकल्या चिंत्या आणि वामन अण्णा या चौघांना जन्मठेपेऐवजी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर सोपान थेटेची मूळ फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली.

पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं, त्या वेळी संशयाचा फायदा देत वामन अण्णाची फाशी रद्द करण्यात आली आणि त्याला मुक्त केलं गेलं. बाकी चौघांची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली. केवळ माफीच्या साक्षीदाराची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही, कारण इतर कुठलाही पुरावा सरकारला सादर करता आलेला नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आणि उत्तमराव-रुक्मिणीची सुटका झाली. मानवत हत्याकांडावर चार जणांच्या फाशीनंतर कायदेशीररीत्या पडदा पडला.

हत्याकांडावर सविस्तर पुस्तक ..

देऊळगावकर यांनी 'मानवत हत्याकांड' या नावाने या प्रकरणाची विस्तृत माहिती आणि खटल्याचं कथन करणारं पुस्तक लिहिलं आहे. या घटनेनंतर जवळपास पंधरा वर्षांनी पत्रकार शरद देऊळगावकर यांनी उत्तमराव बारहाते यांची मुलाखत घेतली. ही सविस्तर मुलाखत त्यांच्या पुस्तकात छापलेली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT