अभिनेत्री तेजस्वी पंडितचा येक नंबर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच 'येक नंबर' चा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सोशल मीडियावर येक नंबरचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पाहोचली आहे. आता चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
येक नंबर चित्रपटाचे शिर्षकगीत रिलीज झाले आहे. एनर्जीने भरलेल्या या गाण्याला अजय-अतुल यांचे संगीत आणि शब्द लाभले असून या जबरदस्त गाण्याला जोनिता गांधीचा आवाज लाभला आहे. तर रॅप सौरभ अभ्यंकर यांचे आहे. गणेश आचार्य यांचे नृत्यदिग्दर्शन लाभलेल्या या गाण्याची खासियत म्हणजे अवघ्या बॉलिवूडला भुरळ घालणारी मलायका अरोरा या गाण्याच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या रॅपसाँगमधून मलायका आपल्या अदाकारीने रसिकांना घायाळ करणार आहे आणि यात तिला साथ लाभणार आहे महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधवची. अशी तगडी टीम लाभलेले हे गाणे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात धुमाकूळ घालणार असल्याचे दिसतेय.
हे आयटम साँग ऐकायला जितके एनर्जेटिक आहे तितकेच ते पाहायलाही कमाल आहे. प्रत्येकाला ठेका धरायला लावणाऱ्या या गाण्यात सिद्धार्थ एका अनोख्या अंदाजात दिसत आहे. मलायका आणि सिद्धार्थला एकत्र पडद्यावर पाहाणे, म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. खूप हॅपनिंग आणि एनर्जीने भरलेले हे गाणे प्रत्येकाच्या ओठांवर रुळणारे आहे.
या गाण्याबद्दल अजय गोगावले म्हणतात, "पूर्वी चित्रपटात हमखास आयटम साँग असायचे. हा प्रकार हल्ली जरा कमी झाला होता. मात्र पुन्हा एकदा आम्हाला येक नंबरच्या निमित्ताने आयटम साँग करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात आयटम साँग असले तरी ते विनाकारण नाही. कारण मुळात कथेची गरज होती. परंतु आपल्याकडे नृत्य म्हटले की मराठी ठेका, आपली एक मराठी शैली येते. परंतु आम्हाला यात काहीतरी वेगळे करायचे होते. त्यामुळे याचाच आधार घेत आम्ही रॅप, हिपहॉप पद्धतीने हे गाणे करण्याचा एक नवीन प्रयत्न केला आहे.''
झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित, 'येक नंबर'चे तेजस्विनी पंडित, वरदा नाडियाडवाला निर्माते आहेत. तर झी स्टुडिओजच्या उमेश कुमार बन्सल यांचेही या चित्रपटाला सहकार्य लाभले आहे. येत्या १० ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटात धैर्य घोलप, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.