Legendary Director Rajdatta: नुकताच ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार' सोहळा पार पडला. या सोहळ्याचे यंदाचे तिसरे वर्ष होते. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात, ठाणे येथे हा सोहळा पार पडला.
रंगभूमीसह छोट्या-मोठ्या पडद्यावर आपल्या अतुलनीय कामगिरीचा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना त्यांच्या मनोरंजन क्षेत्रातील कामगिरीसाठी प्रीमियर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाण्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी नगरसेवक संजय वाघुले इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत चित्रपट, नाट्य आणि वेबसीरीज क्षेत्रातील कलाकारांचा गौरव करण्यात आला.
राजदत्त यांचा सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळ्यात गौरव होताना भारावलेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात उभे राहून त्यांना मानवंदना दिली. ‘हे कौतुक स्वीकारताना मला एका अर्थाने संकोच असा वाटतो, की आयुष्यभर काम करताना ते रसिकांच्या मनापर्यंत पोहोचावे हीच माझी इच्छा होती. बक्षीस मिळण्याच्या अपेक्षेने मी काम केले नाही. मात्र, हे कौतुक मला सतत स्फूर्ती देत राहील,’ अशा शब्दांत राजदत्त यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Entertainment News)
राजदत्त यांचे खरे नाव दत्तात्रय अंबादास मायाळू आहे. राजदत्त याची चित्रपट क्षेत्रातील गुरु म्हणजे राजा परांजपे. गुरुवार असलेल्या श्रद्धेपोटी त्यांनी त्यांच्या नावात बदल केले. राजा परांजपे यांच्या नावातील राजा आणि स्वतःच्या नावातील दत्त एकत्र करून त्यांनी स्वतःचे नाव राजदत्त केले. चित्रपटसृष्टीत त्यांना 'राजदत्त' म्हणून ओळखले जाते.
झगमगत्या तरुण ताऱ्यांचा सत्कार करतानाच आपल्या अलौकिक कामगिरीने मनोरंजनसृष्टीत ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचा गौरव करून ‘सकाळ’ने जुने ते सोने असते याचे महत्त्व सोहळ्यात अधोरेखित केले.
ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त आणि ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे जेव्हा व्यासपीठावर आल्या तेव्हा साऱ्या सभागृहाने जागेवर उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांना मानवंदना दिली. सत्कारामुळे आणि दोघा मान्यवरांनी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेमुळे सारे सभागृह काही काळ एवढे भारावून गेले होते, की बराच वेळ उभे राहिलेल्या रसिकांना आता आसनस्थ व्हावे, असे आवाहन सूत्रसंचालकांना करावे लागले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.