मुंबई: टीव्ही मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या धमाल कॉमेडीने रसिकांना खळखळून हसवणारा प्रसिद्ध दिग्दर्शक- निर्माता केदार शिंदे(Kedar Shinde) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'हाउसफुल', 'घडलंय बिघडलय', 'अंग बाई... अरेच्चा! या मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता पुन्हा एकदा दिग्दर्शक केदार शिंदे प्रेक्षकांना हसवायला सज्ज झाला आहे. नुकतीच त्याने आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेघून घेतले आहे.
दिग्दर्शक केदार शिंदेने त्याच्या(Instagram) इन्स्टाग्राम अकाउंटवर नवीन चित्रपटाचं मोशन पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, दीपा चौधरी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत असतील. पोस्टर शेअर करून त्याने करूया नवीन वर्षाची आंनदादायी सुरूवात, जिओ स्टुडिओजची नववर्षाची खास भेट! प्रत्येक मैत्रिणीला नक्की सांगा, आपला सिनेमा येतोय! केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' ६ जानेवारी २०२३ ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात!, असं कॅप्शनमधून सांगितलं आहे.
चित्रपटात स्त्रीची आयुष्यातील विविध रूपे आणि नाती हे संगळं अनुभवता येणार आहे. आजी, आई, मुलगी ,बायको ,सासू ,मावशी, काकी ,आत्या आयुष्यातील सर्व जिवाभावाच्या नात्यांचा हा चित्रपट आहे. विशेष म्हणजे चित्रपटात सहा आघाडीच्या अभिनेत्रींची धमाल पाहता येणार आहे. काही कारणास्तव एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या आणि कौटुंबिक, वैयक्तिक त्याचबरोबर आर्थिक समस्यांशी दोन हात करणाऱ्या सहा बहिणींची कथा आहे. केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती एम.व्हि.बी. मीडियाच्या माधुरी भोसले यांनी केली असून, बेला शिंदे आणि अजित भुरे सहनिर्माते आहेत.
अलीकडेच चित्रपटाविषयी केदार शिदेंना विचारले असता, "आजवर मी ज्या-ज्या कथा घेऊन आलो, त्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. नेहमीच काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न मी करत असतो. तोच प्रयत्न मी केला असून महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा चित्रपट 'बाईपण भारी देवा' घेऊन आलो आहे. चित्रपट हा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांसाठी ही नववर्षाची आगळीवेगळी भेट असेल."
केदार शिंदेचा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुचर्चित चित्रपटात 'जय जय महाराष्ट्र माझा', 'जेजुरीच्या खंडेराया', 'या गो दांड्यावरून' ही शाहिरांची अजरामर गाणी असणार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.