Kangana Ranaut In Politics : बॉलिवूड असो की राजकारण...त्यावर रोखठोक मते मांडणारी बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत लवकरच राजकारणात एन्ट्री करण्याची शक्यता आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लढवण्याची इच्छा आहे, असं कंगनानं स्पष्टपणे सांगितलं. लोकांची इच्छा असेल तर आणि भाजपने तिला उमेदवारी दिली तर निवडणूक लढवण्याची तयारी आहे, असं तिनं सांगितलं.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात कंगना रनौतनं २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावेळी कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. तसेच त्यांना महापुरूष संबोधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राहुल गांधी हे दोघे प्रतिस्पर्धी आहेत, याचं दुःख वाटतंय, असा टोलाही तिने लगावला.
कंगना रनौत म्हणाली की, 'मोदींचा सामना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी आहे ही मोदींसाठीच दुःखाची बाब आहे आणि मोदी यांच्यासोबत थेट लढत असल्याचे राहुल गांधी यांना दुःख आहे. मोदींना ठाऊक आहे की त्यांचा कुणीही विरोधक नाही. राहुल गांधी त्यांच्या-त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत आहेत.'
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसंदर्भातही कंगनाने मत व्यक्त केले. हिमाचल प्रदेश हा आम आदमी पक्षाच्या खोट्या आश्वासनांना भुलणार नाही. हिमाचलच्या नागरिकांकडे स्वतःची सोलर पॉवर आहे. तेथील लोक स्वतःच भाजीचा मळा फुलवतात. मोफतच्या घोषणांमुळे हिमाचलमध्ये आम आदमी पक्षाला काहीही फायदा होणार नाही. हिमाचलच्या लोकांना फुकटचं काहीच नको, असं कंगना म्हणाली.
कंगनाने (Kangana Ranaut) राजकारणावरही भाष्य केले. राजकारणात आणखी लोक स्वतःहून यावेत, असे ती म्हणाली. बॉलिवूडमध्ये नेपोटिझ्म कधीही संपणार नाही. आता प्रेक्षक जागरूक झाले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. लोकांमध्ये आता बदल झाला आहे. आता घराणेशाही चालणार नाही, असं ते म्हणू लागलेत. स्टार कल्चरही आता संपू लागलाय, असं कंगना म्हणाली.
ट्विटरवर वापसी
ट्विटरवर वापसी झाल्यानंतर कंगनाने प्रतिक्रिया दिली. ट्विटरवर मी एक वर्ष होती. मात्र, ट्विटर मला एक वर्षही सहन करू शकलं नाही. मी जर ट्विटरवर परत आली असती तर तुमचं आयुष्य आणखी चटपटीत झालं असतं, असं ती म्हणाली. कंगना 'इमरजेंसी' या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची भूमिका ती साकारणार आहे. या चित्रपटात अनुपम खेर, सतीश कौशिक, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण आदींच्याही प्रमुख भूमिका आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.