हैदराबादमधील मियापूर परिसरातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. लग्नाला अवघा एक महिना झाला असताना 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामागे हुंडाबळी असल्याचा गंभीर आरोप केला जातोय.
मृत तरुणीचं नाव इशिका यादव असून ती मूळची बिहारला राहणारी होती. इशिका सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करत होती. तिचं करियर उंच शिखरावर असताना मात्र तिच्या आयुष्याचा प्रवास थांबला. मिळालेल्या माहितीनुसार, हा आत्महत्येचा प्रकार असला तरी त्यामागची कारणं अत्यंत गंभीर असल्याचं समोर येतंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इशिकाची ओळख 2020 मध्ये नीरज बंसल या तरुणाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. ओळख वाढत गेली आणि त्यांच्यां मैत्रीचं नातं प्रेमात बदललं. बराच काळ एकमेकांना समजून घेतल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 20 फेब्रुवारी 2026 रोजी दोघांचं कुटुंबियांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं.
लग्नानंतर इशिका आणि नीरज हे दोघं हैदराबादच्या मियापूर भागातील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. दोघंही सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली होती. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरु होतं. मात्र काही दिवसांतच त्यांच्या नात्यात तणाव निर्माण होऊ लागला. शेजाऱ्यांच्या माहितीनुसार, त्यांच्या घरात वारंवार वाद होत असल्याचंही समोर आलं आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पती-पत्नीमधील वादाचं मुख्य कारण म्हणजे अधिक हुंड्याची मागणी होती. आरोप असा आहे की, नीरज बंसल इशिकावर आणखी हुंडा आणण्यासाठी दबाव टाकत होता. या मानसिक छळामुळे इशिका खूप तणावात होती. हळूहळू हा तणाव इतका वाढला आणि तिने अखेर टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय.
इशिकाने आपल्या फ्लॅटमध्ये सीलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच मियापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू आहे.
सध्या पोलीस आत्महत्येमागचं नेमकं कारण काय आहे, तसंच हुंडाबळीचे आरोप कितपत खरे आहेत याचा शोध घेत आहेत. इशिकाच्या कुटुंबीयांचीही चौकशी सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.