जळगावमध्ये सोन्याचा दर १ लाख ६०० रुपये प्रतितोळा झाला
चांदी १ लाख १७ हजार ५०० रुपये प्रति किलोच्या विक्रमी पातळीवर
जागतिक बाजारातील घडामोडींमुळे दर झपाट्याने वाढले
गुंतवणूकदार खूश, पण ग्राहकांसाठी खरेदी अधिक महाग
जळगावमध्ये पुन्हा एकदा सोने–चांदीच्या भावाने उसळी घेतली आहे. सलग तिसऱ्या दिवशी दरवाढ होऊन गुंतवणूकदार आणि ग्राहक यांच्यात चांगलीच खळबळ माजली आहे. शनिवारी स्थानिक सराफा बाजारात सोन्याचा दर प्रतितोळा तब्बल १,००० रुपयांनी तर चांदीचा दर प्रती किलो २,५०० रुपयांनी वाढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आज सोन्याचा दर १ लाख ६०० रुपये प्रतितोळा या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे, तर चांदीने तब्बल १ लाख १७ हजार ५०० रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला आहे.
ही वाढ एकाच दिवसात झालेली नसून गेल्या तीन दिवसांपासून सोने–चांदीत सातत्याने वाढ होत आहे. २१ ऑगस्ट रोजी सोन्याचा दर ३०० रुपयांनी वाढून ९९ हजार ३०० रुपये प्रतितोळा झाला होता. २२ ऑगस्ट रोजी त्यात पुन्हा १०० रुपयांची वाढ होऊन तो ९९ हजार ६०० रुपये झाला. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी सोन्याने तब्बल १,००० रुपयांची झेप घेत १ लाख ६०० रुपयांचा टप्पा ओलांडला. चांदीच्या दरातही असाच चढ-उतार होत असून २१ ऑगस्ट रोजी ती २ हजार रुपयांनी वाढून १ लाख १४ हजार रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी आणखी १,००० रुपयांची वाढ होऊन भाव १ लाख १५ हजार झाला.
आता २४ ऑगस्ट रोजी पुन्हा २,५०० रुपयांची झेप घेत चांदी १ लाख १७ हजार ५०० रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, या अगोदर चांदीचा उच्चांक १ लाख १६ हजार रुपये प्रति किलो एवढाच होता, पण या वेळेस तो विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. सध्याच्या दरानुसार एक किलो चांदीसाठी ग्राहकांना जीएसटीसह तब्बल १ लाख २१ हजार २५ रुपये मोजावे लागत आहेत.
जागतिक बाजारपेठेतील घडामोडींनी या दरवाढीला चांगलाच वेग दिला आहे. काल यूएस फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी येत्या काही महिन्यांत संभाव्य व्याजदर कपातीचे संकेत दिल्यानंतर काही तासांतच भारतातील सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली. काही तासांतच भारतीय बाजारात सोन्याचे दर उंचावले. शनिवारी २४ कॅरेट सोन्याचा दर १०९ रुपयांनी वाढून १०,१६२ रुपये प्रति ग्रॅम झाला, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १०० रुपयांनी वाढून ९,१३५ रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला. १८ कॅरेट सोन्याचा दरदेखील ८१ रुपयांनी वाढून ७,६२१ रुपये प्रति ग्रॅम झाला.
सोन्या–चांदीच्या भावातील या झपाट्याने वाढीमुळे गुंतवणूकदारांना आनंद झाला असला तरी सामान्य खरेदीदारांसाठी ही परिस्थिती चिंताजनक आहे. आगामी गणेशोत्सव आणि लग्नसराईच्या हंगामात सोन्या–चांदीची मागणी वाढते. परंतु, दर विक्रमी पातळीवर गेल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागू शकतो. दुसरीकडे, महागाई व चलनवाढीच्या पार्श्वभूमीवर सोनं सुरक्षित गुंतवणुकीचं साधन असल्याने लोक त्याकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत.
दरम्यान, सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे की जागतिक स्तरावर सोन्याच्या किमती २,४५० डॉलर्स प्रति औंसच्या आसपास पोहोचल्या आहेत. डॉलर निर्देशांक कमकुवत झाल्याने आणि व्याजदर कपातीच्या संकेतामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे भारतातही दर झपाट्याने वाढत आहेत. आगामी काळात सोने–चांदीच्या भावात आणखी चढउतार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.