MahaRERA, Property registration, Builder-buyer agreement Rule in Marathi : स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करताना अनेकदा फसवणूक किंवा बिल्डरच्या दिरंगाईचा सामना करावा लागतो. मात्र, घर खरेदीदारांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी 'रेरा' (RERA) कायदा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. घर खरेदी करताना बिल्डरकडून कोणकोणत्या सोयी-सुविधा आणि कायदेशीर हक्क मिळायला हवेत? तसेच खरेदीदार म्हणून तुमच्यावर कोणत्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात? RERA कायद्यातील या महत्त्वाच्या नियमांबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणे प्रत्येक घर खरेदीदारासाठी अत्यंत गरजेचे आहे.
घर खरेदी करणे म्हणजे फक्त घराचे पैसे भरणे आणि ताबा (Possession) मिळण्याची वाट पाहणे एवढेच नाही. 'रेरा' (RERA - स्थावर मालमत्ता कायदा, २०१६) अंतर्गत घर खरेदीदारांना काही महत्त्वाचे कायदेशीर हक्क मिळाले आहेत. तसेच त्यांच्यावर काही जबाबदाऱ्याही सोपवण्यात आल्या आहेत. या कायद्यातील कलम १९ (Section 19) मध्ये घर खरेदीदारांचे हक्क आणि त्यांची कर्तव्ये स्पष्टपणे सांगण्यात आली आहेत.
प्रकल्पाची संपूर्ण माहिती मिळवण्याचा अधिकार
घर खरेदीदाराला त्यांनी घेतलेल्या प्रकल्पाविषयीची महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. सरकारी प्राधिकरणाने (Authority) मंजूर केलेले इमारतीचे बांधकाम आराखडे (Building Plans), लेआउट आणि प्रकल्पाची सर्व तांत्रिक माहिती मिळवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. 'रेरा' (RERA) कायद्यानुसार आणि बिल्डरसोबत झालेल्या कराराअंतर्गत (Agreement) असलेली सर्व महत्त्वाची कागदपत्रे घेण्याचा अधिकार आहे. यामुळे खरेदीदाराला हे सहज तपासता येते की, बिल्डरने विकताना जे आश्वासन दिले होते आणि सरकारकडून जे प्लॅन मंजूर करून घेतले आहेत, त्यानुसारच प्रत्यक्ष काम सुरू आहे की नाही.
काम पूर्ण होण्याची कालमर्यादा आणि वेळापत्रक
इमारतीचे काम किती दिवसांत आणि कसे पूर्ण होणार, हे समजून घेण्यासाठी खरेदीदाराला टप्प्याटप्प्याचे वेळापत्रक (Stage-wise Schedule) मागण्याचा अधिकार आहे. त्यामध्ये पाणीपुरवठा (Water Supply), स्वच्छता व सांडपाणी व्यवस्था (Sanitation), वीजपुरवठा (Electricity) या आवश्यक मूलभूत सुविधाची माहिती असायला हवी. यामुळे तुम्हाला हे तपासता येते की, प्रकल्प मंजूर योजनांनुसार आणि विकासकाने दिलेल्या आश्वासनांनुसार विकसित केला जात आहे की नाही.
घर खरेदीदारांना मिळालेले मुख्य हक्क (Your Rights):
बिल्डरकडून प्रकल्पाचा आराखडा (Plan), लेआउट, मंजुरीची कागदपत्रे आणि काम पूर्ण होण्याच्या वेळेची अचूक माहिती मिळवण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. बिल्डरने ठरवून दिलेल्या वेळेत घराचा ताबा न दिल्यास किंवा कामाला उशीर केल्यास, खरेदीदार म्हणून तुम्हाला व्याजासह परतावा किंवा भरपाई मागण्याचा अधिकार आहे. ताबा मिळताना घराशी संबंधित सर्व कायदेशीर कागदपत्रे आणि मंजुरीपत्रे (Occupancy Certificate) बिल्डरकडून मिळवण्याचा हक्क असतो.
घर खरेदीदारांच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या (Your Responsibilities):
विक्री करारात (Agreement for Sale) ठरल्यानुसार घराचे हप्ते किंवा उर्वरित रक्कम वेळेवर भरणे ही खरेदीदाराची प्राथमिक जबाबदारी आहे. वेळेवर पैसे न दिल्यास करारात नमूद केलेले व्याज किंवा दंड भरावा लागू शकतो. खरेदीदाराने बिल्डरसोबत केलेल्या करारातील कायदेशीर अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक आहे. तुम्हाला नोंदणी शुल्क, महानगरपालिका कर, पाणी व वीज शुल्क, देखभाल शुल्क, जमिनीचे भाडे आणि इतर लागू शुल्कांचा तुमचा वाटा देखील भरावा लागू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.