Apple ने अखेर आपला पहिला फोल्ड होणारा iPhone बाजारात आणलाय. कंपनीने या नव्या फोनला iPhone Duo असं नाव दिलंय. या फोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या असून, फोन उघडल्यानंतर मोठी वाइड स्क्रीन मिळते. फोल्डेबल फोनच्या बाजारात iPhone Duo ची थेट टक्कर Samsung Galaxy Z Fold 8 सोबत होणार आहे.
iPhone Duo सोबतच Apple ने iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max हे दोन प्रीमियम स्मार्टफोनही लॉन्च केलेत. याशिवाय कंपनीने Apple Watch Series 12, Watch Ultra 4 आणि AirPods 5 देखील सादर केले आहेत.
iPhone Duo मध्ये बाहेरील बाजूला 5.4 इंचांचा कव्हर डिस्प्ले देण्यात आलाय. फोन उघडल्यानंतर 7.6 इंचांची इनर स्क्रीन मिळते. त्यामुळे फोन बंद असताना तो नेहमीच्या स्मार्टफोनप्रमाणे वापरता येतो, तर उघडल्यानंतर मोठ्या स्क्रीनचा फायदा घेता येतो. या फोनच्या बॉडीसाठी एयरोस्पेस ग्रेड टायटेनियम फ्रेम वापरण्यात आलीये. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी Apple ने Ceramic Shield 2 दिले आहे.
Apple च्या म्हणण्यानुसार, iPhone Duo मध्ये वापरण्यात आलेला हिंज इतर फोल्डेबल फोनपेक्षा वेगळा आहे. हा हिंज कस्टम व्हेरिएबल टॉर्क प्रोफाइल, कार्बन सपोर्ट प्लेट आणि मॅग्नेट यांच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.
iPhone Duo मध्ये A20 Pro चिपसेट देण्यात आला आहे. हाच चिपसेट iPhone 18 Pro मध्येही वापरण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 48 मेगापिक्सेलचा Fusion Main कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय 48 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा देखील मिळतो.
भारतामध्ये iPhone Duo ची सुरुवातीची किंमत 2,99,900 रुपये आहे. या किमतीत 256GB इंटरनल स्टोरेज मिळते.
या फोनची विक्री 23 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. Apple ने iPhone Duo दोन रंगांमध्ये लॉन्च केला आहे. यामध्ये नाइटस्काय आणि स्टार व्हाइट या रंगांचा समावेश आहे. फोनच्या टॉप-एंड मॉडेलमध्ये 2TB स्टोरेज मिळणार आहे. या मॉडेलची किंमत तब्बल 4,49,900 रुपये आहे.
Apple ने iPhone 18 Pro सीरीजमध्ये दोन नवीन मॉडेल्स सादर केले आहेत. यामध्ये iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max यांचा समावेश आहे. भारतात iPhone 18 Pro ची सुरुवातीची किंमत 1,64,900 रुपये आहे. तर iPhone 18 Pro Max ची सुरुवातीची किंमत 1,79,900 रुपये ठेवण्यात आली आहे. या दोन्ही फोनसाठी 12 सप्टेंबरपासून प्री-बुकिंग सुरू होणार आहे.
iPhone 18 Pro सीरीजमध्ये Apple ने नवीन A20 चिपसेट दिलाय. कंपनीच्या दाव्यानुसार, हा प्रोसेसर iPhone 17 Pro च्या तुलनेत 30 टक्के अधिक वेगवान आणि अधिक पॉवर एफिशिएंट आहे. यासोबतच नवीन iPhone 18 Pro सीरीजमध्ये AI आधारित क्षमता देखील देण्यात आल्या आहेत.
iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max या दोन्ही फोनमध्ये 48MP Fusion Main कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेऱ्यात व्हेरिएबल अपर्चरची सुविधा आहे. या फीचरमुळे iPhone 18 Pro सीरीज जुन्या iPhone मॉडेल्सपेक्षा वेगळी ठरते.
Apple ने iPhone 18 Pro सीरीजच्या डिझाइनमध्येही काही बदल केलेत. यावेळी Dynamic Island पूर्वीपेक्षा छोटा करण्यात आला आहे. कंपनीने हे फोन नवीन रंगांमध्येही आणले आहेत. यामध्ये Burgundy हा एक्सक्लुझिव्ह कलर देण्यात आला आहे.
नवीन iPhone सोबत Apple ने स्मार्टवॉचच्या नव्या मॉडेल्सचीही घोषणा केली आहे. यामध्ये Apple Watch Series 12 आणि Apple Watch Ultra 4 यांचा समावेश आहे. Apple Watch Series 12 ची सुरुवातीची किंमत 56,900 रुपये आहे. तर या सीरीजमधील टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 1,24,999 रुपये आहे.
दरम्यान, Apple Watch Ultra 4 ची सुरुवातीची किंमत 1,09,900 रुपये असून, त्याच्या टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 1,24,900 रुपये आहे.
Apple ने या लॉन्च इव्हेंटमध्ये AirPods 5 देखील सादर केले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यामध्ये बेस्ट-इन-क्लास ओपन-इअर अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन फीचर देण्यात आलेत. AirPods 5 ची सुरुवातीची किंमत 14,900 रुपये आहे. तर वायरलेस चार्जिंग केससह AirPods 5 ची किंमत 17,900 रुपये ठेवण्यात आलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.