Lampi Virus News : महाराष्ट्रात लम्पी चर्मरोगाचा (lumpy disease) होत असलेला प्रादुर्भाव विचारात घेऊन या रोगावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी पशुपालकांना लंपी रोगाविषयी संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात (mantralay) समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता यांनी दिली. त्यासाठी समन्वय कक्षातील (दूरध्वनी क्रमांक ०२२-२२८४५१३२) संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.
गुप्ता म्हणाले राज्यात लम्पी चर्मरोगावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण करणे, बाधीत पशुधनास औषधोपचार करणे, पशुपालकांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे इत्यादी कार्यवाही युध्दपातळीवर सुरु आहे. तथापि, काही ठिकाणी पशुपालकांना येणाऱ्या समस्या, अडचणीचे निराकरण करुन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, तसेच शेतकरी पशुपालकांना संपर्क साधता यावा आणि क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय साधता यावा यासाठी मंत्रालयामध्ये रुम नं. ५२०, पाचवा मजला (विस्तार) येथे समन्वय कक्ष सुरु करण्यात आला आहे. सदर समन्वय कक्षास ०२२-२२८४५१३२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.
पदुम प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, यांनी आज पशुसंवर्धन आयुक्तांसह राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद व इतर सर्व संबंधित अधिकारी) यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. सदर बैठकीमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव, यावर करण्यात आलेल्या व येणाऱ्या उपाय योजना, तसेच इतर सर्व अनुषंगिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करून, पशुधनावर आलेल्या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाय योजना तातडीने कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले.
राज्यस्तरीय कार्यदलाचे गठन
राज्यातील चर्मरोगाचा वेळोवेळी आढावा घेणे व सदर रोग प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी अंमलात येत असलेल्या व आणावयाच्या उपाययोजनांबाबत क्षेत्रिय यंत्रणेस मार्गदर्शन करणे, रोग प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी घ्यावयाच्या निर्णयाबाबत राज्य शासनास शिफारस करणे इत्यादीसाठी आजच्या शासन निर्णयानुसार आयुक्त पशुसंवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यदलाचे गठन करण्यात आले आहे. सदर कार्यदलामध्ये तज्ज्ञ व्यक्ती व शास्त्रज्ञांचा समावेश करण्यात आलेला आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.