चेतन व्यास
वर्धा : सध्या वीजबिलावरुन संपूर्ण राज्यात रणकंदन सुरु आहे. असे असतानाच वर्धा शहरालगतच्या उमरी (मेघे) परिसरातील शेतकऱ्याच्या (Farmer) शेतात वीज मीटरची मागणी करुनही मागील दोन वर्षांपासून मीटर बसविण्यात आले नाही. असे असतानाच (MSEDCL) महावितरणचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून शेतात वीजजोडणी नसताना देखील शेतकऱ्याला १४ हजारांचे बिल पाठवून महावितरणने नवीनच पराक्रम केला आहे. (Wardha News MSEDCL Electric Bill)
वर्धा (Wardha) तालुक्यातील उमरी येथील शेतकरी चिंतामण लक्ष्मण सहारे यांच्याकडे 2 हेक्टर 74 आर शेत आहे. शेतातील पिकांना पाण्याची नितांत गरज असल्याचे शेतात विहीर खोदून त्यांनी २०२० मध्ये 3 एचपीच्या कनेक्शनसाठी महावितरणकडे ६ हजार ८७० रुपयांचा डिमांड भरला होता. मात्र, दोन वर्षांचा कालावधी उलटूनही शेतकऱ्याच्या शेतात वीज मीटर बसविण्यात आले नाही.
तरी २३० युनिट नुसार आकारले बिल
दोन वर्ष लोटूनही वीज मिटर बसाविण्यात आले नाही. मात्र शेतकरी चिंतामण सहारे यांना चक्क ५ हॉर्स पॉवरच्या मोटार पंपानुसार तब्बल १४ हजार २३० रुपयांचे वीज बिल पाठविण्यात आले. त्यामुळे महावितरणचा कारभार कसा अंधारात लपंडाव खेळल्यासारखा आहे. याचा प्रत्यय येतो. शेतकऱ्याला विद्युत कनेक्शन देण्यासाठी शेतात खांब देखील उभारण्याची गरज नाही. वीजमीटर नसताना १४ हजारांचे बिल आले कसे? हा प्रश्न आहे. आधी माझ्या शेतात वीजमीटर बसवा, नंतर बिल पाठवा, आता शेती कशी करावी, हा प्रश्न शेतकरी विचारत आहे.
निव्वळ फसवणूक
आतापर्यंत कमी अधिकच्या वीजबिलातील तक्रारी केल्या जात होत्या. मात्र थेट वीज कनेक्शन न देता वीजेच्या वापराचे बिल देणे म्हणजे ही निव्वळ फसवणूकच आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात ज्या शेतात कनेक्शनच नाही; तेथे 14 हजारापर्यंत वीजबिल कशी असा सवाल उपस्थित होतो. त्यामुळे वीजबिल वाटपापासून ते वीज जोडणीपर्यंतची प्रक्रिया ही संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यामुळेच महावितरणने वितरीत केलेल्या बिलावर सर्वसामान्य ग्राहकांना विश्वासच बसत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.