
नाशिक: पावसानं ओढ दिल्यानं यंदा ऐन पावसाळ्यातचं उत्तर महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या पाचही जिल्ह्यात पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात आला असून ऐन पावसाळ्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता उत्तर महाराष्ट्रातले शेतकरी आणि नेते करत आहे.
पावसाअभावी सुकून चाललेली पिकं तर कुठे पाण्याअभावी ग्लास-ग्लास पाणी ओतून सुरू असलेली पिकं वाचवण्याची धडपड. सध्या उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक भागात हेच चित्र पाहायला मिळतंय. सुरुवातीच्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी कशी बशी पेरणी उरकली खरी, मात्र पाऊस गायब झाल्यानं आता पेरणी केलेली पिकं पाण्याअभावी सुकू लागल्यानं शेतकऱ्यांच्या पेरण्या धोक्यात आल्यात. कुठे पेरणीसाठी केलेली मेहनत आणि खर्च तर कुठे दुबार पेरणी करूनही पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झालीय. त्यामुळे सरकारनं दुष्काळ जाहीर करून मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती
नाशिक
- नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 15 टक्के कमी पावसाची नोंद
- जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 56 टक्के पाणीसाठा
- येवला, नांदगाव, मालेगावसह बागलाणमध्ये दुष्काळ परिस्थितीचं सावट
धुळे
- धुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरीच्या 36 टक्के पाऊस
- शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात दुष्काळाचं सावट
नंदुरबार
- नंदुरबार जिल्ह्यातही आत्तापर्यंत केवळ 34.1 टक्के पाऊस
- संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट
जळगाव
- जळगावात सरासरीच्या 50 टक्केच पाऊस
- अमळनेर, धरणगाव, पारोळा तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती
अहमदनगर
- नगर जिल्ह्यात मागील 53 दिवसांपासून पावसाचा खंड
- आत्तापर्यंत 60.10 टक्केच पाऊस
- कर्जत, जामखेड, पाथर्डी, नगर आणि अन्य काही भागावर दुष्काळाचं सावट
उत्तर महाराष्ट्रात यंदा पावसाचा असमतोल मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. काही भागात पाऊस, तर काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐन पावसाळ्यात पावसाअभावी पिकं धोक्यात आली आहेत. त्यामुळे सरकारनं दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी आता लोकप्रतिनिधींकडूनही होऊ लागलीय. भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाचा मुद्दा जोर धरू लागलाय.
जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावलेली असली, अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागणा आहे. तरच वर्षभराच्या पाण्याचं नियोजन भरून निघेल. तर पावसाचा मोठा खंड पडल्यानं नाशिक जिल्ह्यातही धरणांमधील शिल्लक पाणीसाठा वर्षभर पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. आगामी काळात पाऊस न झाल्यास खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे कोरोनासोबतच कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळीचा फटका सहन करावा लागत असलेल्या शेतकऱ्यांच्या समोर कोरड्या दुष्काळाचं नवं संकट उभं ठाकलंय. आगामी काळात जोरदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांसोबतच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.