औरंगाबाद - राज्याचे कृषि मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी विधीमंडळात पंचगंगा सिड्सचा परवाना रद्द करण्याच्या निर्णयावर न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. याप्रकरणी सुनावणी प्रलंबीत असतांना अशा पद्धतीने परवाना रद्द करणे बेकायदेशीर आहे. मंत्र्यांना असे अधिकारच नाहीत, असे न्यायालयाने सांगीतले. मंत्र्यांची घोषणा आणि कृषि संचालकांचा निर्णय रद्दबातल ठरवितांना पंचगंगा सिड्सला परवाना बहाल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
पंचगंगा सिड्सकडे २००३ पासून व्यवसायाचा परवाना असून त्याचे डिसेंबर २०२६ पर्यंत नूतनीकरण करण्यात आले. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी औरंगाबादच्या जिल्हा कृषि अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यास पंचगंगा सिड्सने ६ डिसेंबर २०२१ रोजी उत्तर दिले. १६ डिसंेबर २१ रोजी कृषि अधिकाऱ्यांनी कृषि संचालकांना अहवाल सादर केला. त्यानंतर २७ जानेवारी २०२२ रोजी कृषि संचालकांनी कंपनीला परत एकदा कारणे दाखवा नोटीस बजावली. यास त्यांनी ३ फेब्रुवारी २०२२ राेजी उत्तर दिले. त्यावर ४ मार्च २०२२ रोजी कृषि संचालकांनी कंपनीला १५ मार्च २०२२ रोजी प्रत्यक्ष सुनावनीला हजर राहण्याची सूचना केली.
हे देखील पहा -
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ८ मार्च २०२२ रोजी आमदार अनील पाटील, महेंद्र थोरवे आणि बालाजी कल्याणकर यांनी लक्षवेधीद्वारे कंपनीतील गंभीर स्वरूपाचे आरोप केले. त्यावर कागदपत्रे बघून कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी कंपनीचा परवाना रद्द करण्याची घोषणा केली. ९ मार्च रोजी कृषि संचालकांनी कंपनीचा परवाना रद्द करण्याचे आदेश काढले. या आदेशाला पंचगंगा सिड्सने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. त्यावर १६ मार्च रोजी सुनावणी झाली.
अॅड.आर.एन.धोर्डे पाटील यांनी १५ तारखेला सुनावणी असतांना त्यापूर्वी कृषि मंत्र्यांनी परवाना रद्द करण्याच्या घोषणेवर आक्षेप नोंदवले. त्यावर सरकारी वकीलांनी अधिवेशन सुरू असल्याने मंत्र्यांना असे अधिकार असल्याचे सांगीतले. दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकूण घेतल्यावर न्यायमूर्ती एस.जी.मेहरे आणि आर.एन.धानुका म्हणाले, सुनावनी प्रलंबीत असतांना मंत्र्यांनी परवाना रद्द करण्याचे आदेश काढायला नको होते. असे आदेश काढणे बेकायदेशीर कृत्य आहे. लक्षवेधी सूचनेवर परवाना रद्द करता येत नाही.
यामुळे ८ मार्च २०२२ रोजीची मंत्र्यांची घोषणा आणि ९ मार्च रोजी कृषि संचालकांनी काढलेले आदेश रद्दबातल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. कृषि संचालकांनी पंचगंगा सिड्सला सुनावणीसाठी नवीन तारीख द्यावी. त्यावर सुनावणी करतांना कृषि मंत्र्यांनी सभागृहात काय सांगीतले, याचा प्रभाव पडायला नको, याची दक्षता घेण्याची सूचना न्यायालयाने दिली.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.