इतिहास, निसर्ग, थंड हवा, ट्रेक आणि मनाला उभारी देणारा परिसर यामुळे सिंहगड किल्ला नेहमीच पुणेकरांचा आवडता ठरतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेला हा किल्ला आजही शौर्यकथांचा पुरावा देतो.
सिंहगड किल्ला तानाजी मालुसरे यांच्या शौर्यामुळे प्रसिद्ध असून ‘गड आला पण सिंह गेला’ ही ऐतिहासिक घटना याच किल्ल्यावर घडली. मराठा साम्राज्याच्या दृष्टीने हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता.
वाकड परिसरातून सिंहगडावर ३०-४० मिनिटांत पोहोचता येतो. रस्ता पूर्णपणे पक्का असून वरपर्यंत गाडी नेण्याची सोय आहे. त्यामुळे कुटुंबासोबतही तुम्ही या थंडीच्या दिवसात जाऊ शकता.
सिंहगडच्या माथ्यावर वर्षभर थंड हवा आणि धुक्याचं वातावरण अनुभवायला मिळतं. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण नेहमीच खास वाटतं.
कोंडणेश्वर बाजूचा ट्रेक, आतकरवाडी ट्रेक किंवा रस्त्याने वर जाणं असे सिंहगडवर पोहोचण्यासाठी अनेक मार्ग आहेत. नव्या ट्रेकर्ससाठी हा ट्रेक उत्तम मानला जातो.
किल्ल्यावर केसरवाडी दरवाजा, पुर्व दरवाजा, तानाजी स्मारक, किल्ल्याची तटबंदी आणि प्राचीन बांधकाम पाहायला मिळतं. प्रत्येक भागामागे एक वेगळी ऐतिहासिक कथा दडलेली आहे.
सिंहगडची खास झणझणीत पिठलं-भाकरी, कांदा भजी, ताक आणि गरमगरम चहा...या ठिकाणी आलात तर याचा आनंद नक्कीच घ्या.
गडाच्या माथ्यावरून ढगांमधून डोकावणाऱ्या दऱ्या आणि हिरवाईने नटलेला परिसर यामुळे फोटोग्राफरसाठी सिंहगड स्वर्गच आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी किल्ला आणखी मोहक दिसतो.