
मुंबईतील कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना अद्यापही ताजा आहे. अशातच आता मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील शाळेतील शाळकरी विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाण्यासाठी निघालेल्या बसचे चालक आणि वाहक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचे आढळून आले आहेत. पोलिसांनी वेळेवर बस थांबवल्यामुळे पुढचा अनर्थ टळला आहे.
दारूच्या नशेत बस अंधेरी कुर्ला रोडवर नागमोडी चालवत असताना कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपाई मोहन पवार, पोलीस शिपाई गणेश भगत या वाहतूक पोलिसांनी बस थांबवली. चौकशी केली असता बसचे वाहन चालक आणि वाहक दोघेही दारूचे नशेत असल्याचं समोर आले. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून सध्या वाहन चालक आणि वाहका विरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात कारवाई सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वेकडील साकीनाका भागातील एका विद्यालयाची सहल गोराई पॅगोडा येथे जाण्यासाठी शाळेकडून विद्यार्थ्यांना नेण्यासाठी खाजगी टूर ऑपरेटरच्या माध्यमातून बस उपलब्ध करून देण्यात आली. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बस शाळेच्या मैदानातून विद्यार्थ्यांना घेऊन गोराईच्या दिशेने जाण्यासाठी निघाली.
यावेळी अंधेरी कुर्ला रोडवर बस चालक ही बस नागमोडी वळणे घेऊन चालवत असल्याचे दिसून आले. यावेळी त्या ठिकाणी शहर वाहतूक विभागाचे कर्तव्यावर असणारे पोलीस शिपाई मोहन पवार आणि गणेश भगत यांनी वाहनचालकाला बस बाजूला घेण्यास सांगितले. त्यानंतर या दोघांची चौकशी केली असता वाहन चालक व वाहक असे दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचं आढळून आलं.
या सर्व प्रकारानंतर शहर वाहतूक विभाग पोलिसांनी बस ताब्यात घेतल्यानंतर शाळेचे मुख्यध्यापक आणि पालकांना बोलावलं. बसमध्ये शाळेचे 40 ते 50 विद्यार्थी असून टूर ऑपरेटर आणि शाळेकडून विद्यार्थ्यांना आता बसवर दुसऱ्या चालक वाहकाची नेमणूक करून देण्यात आली आहे. तर मद्यधुंद चालक आणि वाहक दोघांना अंधेरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून त्या ठिकाणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.