लाडक्या बहिणीचा हप्ता १५०० वरून २१०० रूपये करण्याचं आश्वासन महायुती सरकारनं निवडणुकांपूर्वी दिलं होतं. महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना २१०० रूपयांचे वेध लागले आहेत. मात्र राज्यातल्या तब्बल अडीच कोटी लाडक्या बहिणींचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण २१०० रूपये देण्याबाबत कोणताही प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर नसल्याचं स्वत: महिला व बाल कल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय. नेमकं काय म्हटल्या आहेत तटकरे ते पाहूयात....
लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी अर्थ विभागानं त्याची तयारी 3 ते 4 महिने अगोदर सुरू केली होती. 2100 रूपयांपर्यंत लाभ वाढवण्यासाठी देखील तशीच तयारी कारवी लागेल. मात्र अद्याप मुख्यमंत्री आणि अर्थखात्याकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत.
आर्थिक भार किती आहे याबाबतचा अभ्यास करून निर्णय घेतला जाणार असल्याचंही तटकरे यांनी सांगितलंय. काही दिवसांपूर्वी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाडक्या बहिणींना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना २१०० रूपये मिळणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे लाडकीच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.
लाडकीच्या १५०० रूपये हप्त्यामुळे सरकारवरी तिजोवर भार वाढल्याचं अनेक मंत्र्यांनी कबूल केलंय. त्यामुळे नियमबाह्य लाभ घेत असलेल्या लाडकींना वगळण्यात येणार आहे. त्यात जर हप्ता २१०० रूपये केला तर सरकारचं टेंशन अधिकच वाढणार आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची सरकार पूर्तता करणार की १५०० रूपयांवर समाधान मानावं लागणार असा प्रश्न राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना पडलाय.