मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी टॉय ट्रेन पुन्हा धावणार|VIDEO

Sanjay Gandhi National Park: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी टॉय ट्रेन चार वर्षांनंतर पुन्हा सुरू होत आहे. विंटेज मिनी ट्राय ट्रेन आणि नवीन व्हिस्टाडोम ट्रेनची चाचणी सुरू असून पारदर्शक छत व मोठ्या खिडक्यांसह अनोखा पर्यटन अनुभव लवकरच मुंबईकरांना मिळणार आहे.

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी—संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीची ‘वनराणी’ टॉय ट्रेन आता नव्या अवतारात, दोन विशेष रूपांत परत उद्यानातील घनदाट जंगलातुन धावणार आहे. एक आधुनिक विस्टाडोम इलेक्ट्रिक वनराणी आणि दुसरी जुन्या काळाची आठवण करून देणारी विंटेज स्टाईल वनराणी उद्यानात दाखल झाली असून दोन्ही गाड्यांच्या ट्रायल्स वेगात सुरू आहेत. २० नोव्हेंबरच्या सुमारास दोन्हीही टॉय ट्रेन अधिकृतपणे पर्यटकांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

मे 2021 मध्ये झालेल्या तौक्ते चक्रीवादळात उद्यानातील 2.3 किमी टॉय ट्रेन मार्गावर मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली. रुळांसह स्लीपर्सचे नुकसान झाल्याने, मागील चार दशकांपासून पर्यटकांना आकर्षित करणारी वनराणी पूर्णपणे बंद पडली.

गेल्या तीन वर्षांपासून वनराणीचे पुनर्बांधणी काम प्रलंबित होते; मात्र अखेर शासनामार्फत निधी मंजूर झाल्यानंतर रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस (RITES) यांच्या माध्यमातून रुळ, स्लीपर्स आणि संपूर्ण ट्रॅक नव्याने उभारण्यात आला. आता हा मार्ग पुन्हा एकदा अधिक सुरक्षित, आधुनिक आणि आकर्षक करण्यात आला आहे.

नव्या वनराणीची वैशिष्ट्ये — आधुनिकता आणि विंटेजचा संगम

सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर एक नव्या रूपात वनराणी उद्यानातील नव्या रुळावरून धावणार आहे. नेमक्या या वनराणीचे वैशिष्ट्य म्हणजे विस्टाडोम इलेक्ट्रिक वनराणी जी पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे.शिवाय विजेवर चालणारी असून पर्यावरणपूरक ट्रेन देखील आहे. सोबतच संपूर्णपणे मोठमोठ्या काचेच्या खिडक्यांमुळे पर्यटकांना घनदाट जंगलाचा अधिक खुला अनुभव घेता येणार आहे. या प्रत्येक वनराणीच्या इंजिनला चार डबे जोडण्यात आले असून याची प्रवासी क्षमता 80 इतकी आहे. महत्वाचे म्हणजे आधुनिक सुरक्षा सुविधा देखील यात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

दुसरी आणि हिरव्या रंगांमध्ये असणारी विंटेज वनराणी देखील पर्यटकांना भुरळ घालणारी असून जुना चार्म पुन्हा जागवणारा क्लासिक लुक इथे पाहायला मिळत आहे.संपूर्णपणे भारतीय बनावटीची हिरव्या रंगाचे विंटेज इंजिन व डबे त्याचप्रमाणे चार डब्यांची रचना आहे. या मधून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना खुल्या वातावरणात जंगल सफरीचा अनुभव घेता येईल.

दोन्ही गाड्यांच्या ३–४ दिवसांच्या ट्रायल रन सुरू असून, कार शेड परिसरात उद्यानातील तांत्रिक पथक त्यांची तपासणी करत आहे.

बोगदे, स्थानकांचे नूतनीकरण – ‘लोणावळा-खंडाळा’चा फील मुंबईत!

टॉय ट्रेनच्या मार्गावर असलेले काही कृत्रिम बोगदे व छोटे स्टेशनही नव्याने दुरुस्त केले आहेत. ट्रेनमधून प्रवास करताना पर्यटकांना लोणावळा-खंडाळा घाट भागातील रेल्वे बोगद्यांसारखा अनुभव मिळेल, असा संकल्प उद्यान प्रशासनाने केला आहे.

जंगल सफरीची मजा – पुन्हा एकदा ‘झुकझुक’चा थरार

उद्यानात येणाऱ्या पर्यटकांमध्ये नेहमीच

कान्हेरी गुंफा,

वाघ-सिंह सफारी,

नौकाविहार,

निसर्ग माहिती केंद्र

या ठिकाणांबरोबरच ‘वनराणी’चा प्रमुख आकर्षणात समावेश असायचा.

जंगलाच्या हिरवाईतून मिनी ट्रेनची ३० मिनिटांची फेरी लहान मुलांसाठी रोमांचक आणि मोठ्यांसाठी निसर्गसुख देणारी असते. नवीन दोन वनराणी सेवेमुळे पर्यटकांचा आनंद दुप्पट वाढणार आहे.

१९७४ ते आज… वनराणीचा प्रवास

वनराणीची सुरुवात : 1974

आकर्षक लहान इंजिन + ४ डबे अशी रचना

वार्षिक महसूल : सुमारे ५० लाख रुपये

2021 च्या तौक्ते चक्रीवादळानंतर सेवा पूर्णपणे बंद

आता पुन्हा नव्या तंत्रज्ञानासह पुनरागमन

उद्यान प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, सर्व तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर २० नोव्हेंबरच्या आसपास दोन्ही टॉय ट्रेन पर्यटकांसाठी खुल्या होतील. मुंबईकर, शाळा-मुलं, पर्यटक—सर्वांसाठी हा एक मोठा निसर्गअनुभव ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com