Samarjeet Ghatge : कोल्हापूरचा आखाडा तापला, मुश्रीफ यांच्याविरुद्ध घाटगेंनी थोपटले दंड, VIDEO

Samarjeet Ghatge Vs Hasan Mushrif : शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या हसन मुश्रीफ यांच्यावर समरजीत घाटगे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. त्यामुळं कागलच नव्हे तर, कोल्हापूरचा राजकीय आखाडाही तापला आहे.

Samarjeet Ghatge on Hasan Mushrif : विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापूरचा आखाडा तापला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले समरजीत घाटगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे.

समरजीत घाटगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी हसन मुश्रीफ यांनी केलेल्या टीकेला घाटगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. कागलची जनता स्वाभिमानी आहे. ती माझी पाठराखण करणार आहे. माझ्या मागे शरद पवारांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे मला कोणत्याही गोष्टींची काळजी करण्याची गरज नाही. अशा बऱ्याच धमक्या याआधी मुश्रीफ यांनी मला दिल्या आहेत. आताही कदाचित देतील. मी त्यांच्या गोष्टींना फार गांभीर्याने घेत नाही, असं थेट विधान घाटगे यांनी केलं.

मला काही बोला, पण शरद पवारांवर...

हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेलाही घाटगेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मला काही बोलतात, ते बोलू देत. पण मला त्या वक्तव्याचा राग आहे आणि खंतही वाटते. पवार यांचे अनेक वर्षाचे राजकारण आहे. विरोधी पक्षानेही त्यांच्यावर असे बोलायचे धाडस केले नाही. मात्र ते काम पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले आहे. मुश्रीफ यांनी आता शरद पवार यांच्यावर जातीवाचक आरोप केला. त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो, असे घाटगे म्हणाले.

तुम्ही घोर पाप केलं

घाटगे म्हणाले की, ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्व पदे दिली; तेव्हा त्यांना अल्पसंख्याक म्हणून विषय नव्हता का? ते तुमच्या वडिलांच्या वयाचे आहेत. त्यांच्यावर कुणीही असले आरोप करायचे धाडस करत नाही. ते तुम्ही केलं, तुम्ही हे घोर पाप केलं आहे.

महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. पुरोगामी विचारांची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही. समरजीत घाटगे यांना काय बोलायचं ते बोला. पण तुम्ही जाहीर माफी मागावी. शरद पवार यांना मुश्रीफ यांनी टार्गेट केले. शरद पवार आले. सभा घेतली. त्यांनी आपले विचार मांडले. तुम्ही त्यांच्यावर आरोप करण्याचे धाडस करत आहात. ते नेहमीच जातीचे कार्ड वापरतात. ईडीच्या छाप्यानंतरही त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यावेळीही मी अल्पसंख्याक असल्याने मला टार्गेट केलं जात असल्याचे ते म्हणाले होते. पण नंतर त्यांनी काय केलं, हे सर्वांना माहिती आहे. शरद पवार यांच्यावर जातीचा आरोप करताय हे चुकीचे आहे, असेही घाटगे म्हणाले.

कागलची बदनामी करू नका!

मुश्रीफ यांनी मला टार्गेट केले आहे. माझ्या पत्नीला देखील टार्गेट केले आहे. परवा त्यांच्या सांगण्यावरून कार्यकर्त्यांनी आईसाहेबांना देखील टार्गेट केलं. विरोधकांच्या कोणत्याही टीका टिप्पणीला आम्ही विरोध करणार नाही. त्यांच्या अशा या वक्तव्यामुळे कागलचे नाव खराब होत आहे. कृपया मुश्रीफ यांनी कागलची बदनामी करू नये. हसन मुश्रीफ यांना जास्त स्ट्रेस असेल तर गेट वेल सून, असा खोचक टोलाही घाटगे यांनी लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com