पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काल, बुधवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र, विमानतळाच्या नामकरणावरून वाद सुरू झाला आहे. दि. बा. पाटील यांचं नाव या विमानतळाला द्यावं अशी मागणी होत असताना संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. या विमानतळाला नरेंद्र मोदींचे नाव देण्याच्या भाजपमध्ये हालचाली सुरू आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शासकीय निमंत्रण पत्रिकेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उल्लेख होता, पण भाजपच्या निमंत्रण पत्रिकेत दि. बा. पाटील यांच्या नावाचा उल्लेख होता. याबाबत पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारला. त्यावर भाजपची निमंत्रण पत्रिका ही खासगी होती. नवी मुंबई विमानतळाला एक तर गौतम अडाणी विमानतळ किंवा मोदींच्या नावाने त्याचे नामकरण व्हावे, अशी राष्ट्रीय पातळीवरील चर्चा आहे, असं राऊत म्हणाले.
दि. बा. पाटील यांचं विमानतळाला नाव द्यावं अशी शिवसेनेची म्हणजेच आमची भूमिका आहे. त्यांच्या नावाने हे विमानतळ मंजूर आहे. त्यांच्या नावाने मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे असे आमचे म्हणणे आहे. नरेंद्र मोदी तर अजरामर आहेत. ते विष्णूचे तेरावे अवतार आहेत. त्यांचे नाव विमानतळाला देण्याची गरजच नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
नरेंद्र मोदींच्या नावाने ते विमानतळ असावे, अशा हालचाली भाजपमध्ये सुरू आहेत. अडाणींनी मान्यता दिली आहे. पण आमचा ठाम विरोध असेल. दि. बा. पाटील हेच विमानतळाला नाव असावे अशी आमची ठाम भूमिका आहे, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले. दुसरीकडे दि. बा. पाटील यांच्या नावाबाबत पंतप्रधान मोदी सकारात्मक आहेत, असे पत्रकारांनी राऊत यांना सांगितले असता, ते सकारात्मक आहेत म्हणजे काय...त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असे ते म्हणाले.
मोदींनी कालच्या भाषणात उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केल्याचे बोलले जाते, ही बाबही पत्रकारांनी लक्षात आणून दिली. मेट्रोचे भूमिपुजन झाले. पण काही काळासाठी काम थांबलं. त्यामुळं मुंबईकरांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं, असे मोदी म्हणाल्याचे सांगण्यात आले. त्याला संजय राऊत यांनी त्याला उत्तर दिले. मोदी खोटे बोलतात. मेट्रोचं काम का थांबलं? काही पर्यावरणासंदर्भात विषय होते. आरेची जंगलं का तोडली? कांजुरमार्ग कारशेड आहे, त्यासंदर्भातल्या जमिनींच्या समस्या होत्या. मोदींकडे अर्धवट माहिती आहे, असं राऊत यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.