मुंबई-गोवा महामार्गावर भयंकर अपघात, भरधाव ट्रकची लक्झरी बसला धडक; ३० प्रवाशांनी भरलेली बस थेट पलटी, पुढे काय झालं?

Mumbai-Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलावर भरधाव ट्रकने लक्झरी बसला पाठीमागून धडक दिल्याने बस पलटी झाली. अपघातात ३० प्रवासी जखमी असून चौघांची प्रकृती गंभीर आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलावर आज पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने खासगी लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, प्रवाशांनी भरलेली ही बस थेट रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात ३० प्रवासी जखमी झाले असून, त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे.

अपघातानंतर बसमध्ये अनेक प्रवासी अडकून पडले होते आणि घटनास्थळी एकच आरडाओरडा सुरू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी तातडीने धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. सर्व जखमींना तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अंजणारी पुलावरच बस पलटी झाल्यामुळे महामार्गावरील गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, सध्या या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.