VIDEO : महायुतीला खिंडार ! लोकसभेला पराभव, आता स्वबळावर विधानसभा लढणार, महादेव जानकरांचा एकला चलो रे !

Mahadev Jankar News : राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. महादेव जानकर यांनी महायुतीला सोडचिठ्ठी दिल्याने याचा फटका विधानसभेत महायुतीला बसणार आहे.

विधानसभा निवडणुकी आधीच मित्र पक्षाने साथ सोडल्याने राज्यात महायुतीला मोठं खिंडार पडलं आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा मोठा धक्का महायुतीला असणार आहे. तर महायुतीमधून बाहेर पडल्यानंतर महादेव जानकर यांचा पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणूकीच्या 288 जागा लढवणार असल्याचं देखील जानकर यांनी सांगितलं आहे.

विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच महादेव जानकर यांनी साथ सोडल्याने महायुतीला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. जानकर यांनी आपल्या पक्षासाठी महायुतीकडे 40 ते 50 जागांची मागणी केली होती. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने जानकरांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. महायुतीला रामराम ठोकल्यानंतर आता महादेव जानकर यांनी आपला राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर 288 जागा लढवेल असं म्हंटलं आहे. लोकसभेला जानकर यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. आता विधानसभेला त्यांनी महायुतीची साथ सोडल्याने याचा फटका महायुतीला सहन करावा लागू शकतो. धनगर समाजाचा जानकर यांना मोठा पाठिंबा आहे. महादेव जानकर यांच्या पक्षाची सोलापूर, बारामती, परभणी, बीड, जालना सारख्या मतदारसंघात मोठी ताकद आहे. धनगर समाजाची संख्या जास्त असलेल्या मतदारसंघात महादेव जानकरांच्या पक्षाला चांगला पाठिंबा आहे. त्यामुळे ही बाब महायुतीसाठी डोकेदुखी ठरु शकते. तर सोडचिठ्ठी देणाऱ्या जानकरांची भाजप मनधरणी करेल का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com