मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज विराट कोहली याच्या फॉर्मबाबत क्रीडाविश्वात जोरदार चर्चा आहे. विराट कोहलीच्या फॉर्मवरून आजी-माजी क्रिकेटपटूंमध्ये जोरदार जुंपली आहे. काही जण त्याचं समर्थन करत आहेत, तर काही जण अद्याप त्याच्या संघात असण्यावरून टीका करत आहेत. (Virat Kohli-Sunil Gavaskar News Update)
गेल्या तीन वर्षांपासून विराट कोहलीनं (Viral Kohli) एकही शतक झळकावलं नाही. शतकच काय तर त्यानं मोठी धावसंख्याही उभारली नाही. अशात त्याला काही जणांकडून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला जात आहे, तर कुणी त्याच्या तांत्रिक बाजूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याला सल्ला देत आहे.
त्याचवेळी महान फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी आपलं मत मांडलं आहे. विराट कोहलीसोबत चर्चा करण्यासाठी केवळ २० मिनिटे मिळाली तरी, त्याचा फॉर्म परत मिळवण्यासाठी काही मदत करू शकतो, असं सुनील गावसकर म्हणाले.
सुनील गावसकर यांनी विराट कोहलीच्या फॉर्मबाबत सांगितले की, जर मला विराट कोहलीसोबत चर्चा करण्यासाठी २० मिनिटे जरी मिळाली तर, कदाचित फॉर्ममध्ये परत येण्यासाठी काय करावं लागेल, याबाबत मार्गदर्शन करू शकेल. ते नक्की फायदेशीर ठरेल का तर याबाबत निश्चित सांगू शकत नाही, पण ऑफ स्टम्प लाइनसंदर्भात त्याला ज्या अडचणी येत आहेत, त्यावर मी चर्चा करेन, असेही गावसकर म्हणाले.
एका इंग्रजी वृत्तसंस्थेशी बोलताना गावसकर म्हणाले, की 'मी सुद्धा सलामीला फलंदाजी केली आहे. ऑफ स्टम्प लाइनने मलाही त्रस्त केलं होतं. काही गोष्टी आहेत की ज्या विराटला इथे मदत करू शकतात. विराट कोहलीसोबत याबाबत चर्चा करण्यासाठी २० मिनिटे जरी मिळाली तरी, त्या फायदेशीर ठरू शकतात.' दरम्यान, गावसकर यांनी विराट कोहलीचं समर्थन केलं आहे. कोहलीचा रेकॉर्ड बघितला तर, त्याने ७० शतके केली आहेत. अशावेळी तो अपयशी ठरत असेल तर, त्याच्या पाठिशी आपण उभे राहायला हवे, असंही गावसकर म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.