
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) उत्तराखंड उच्च न्यायालयाने १२ कोटी रुपयांच्या गैरवापर प्रकरणात नोटीस बजावली आहे. रिपोर्टनुसार, उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनला दिलेल्या पैशांचा गैरवापर झाला आहे. क्रिकेट निधीमध्ये १२ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, ज्यामध्ये ३५ लाख रुपये फक्त खेळाडूंसाठी केळी खरेदीवर खर्च करण्यात आले आहेत. उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनच्या ऑडिट रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, खेळांडूना फळे देण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींवरही बराच पैसा खर्च कऱण्यात आला आहे.
फक्त केळीवर खर्च केले ३५ लाख रुपये?
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, उत्तराखंड उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी दावा केला आहे की, १२ कोटींपैकी ३५ लाख रुपये फक्त केळी खरेदीवर खर्च झाले आहेत. उत्तराखंडच्या ऑडिट अहवालानुसार,इव्हेंट मॅनेजमेंटवर ६.४ कोटी रुपये खर्च झाले आहेत आणि एकूण २६.३ कोटी रुपये टूर्नामेंट- ट्रायलवर खर्च झाले आहेत. जे मागील आर्थिक वर्षातील २२.३ कोटींपेक्षा जास्त आहे. ही संपूर्ण रक्कम प्रत्यक्ष खर्चापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.
उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी उत्तराखंड असोसिएशनवर अन्न खर्चाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी १९ सप्टेंबर रोजी होणार आहे, ज्यावर बीसीसीआयलाही उत्तर मागितले आहे. यामुळे बीसीआयचे देखील टेन्शन वाढताना दिसत आहे.
उत्तराखंड क्रिकेट बोर्ड वादाच्या भोवऱ्यात
उत्तराखंड क्रिकेट बोर्डावर याआधी देखील घोटाळ्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. २०२२ मध्ये,असोसिएशनने १२ महिन्यांत त्यांच्या खेळाडूंना फक्त १०० रुपये प्रतिदिन दिले असल्याचे उघड झाले होते, इतकेच नाही तर उत्तराखंड क्रिकेट संघातील खेळाडूंनी मानसिक आणि शारीरिक शोषणाचे आरोपही केले होते. न्यायमूर्ती मनोज कुमार तिवारी यांच्या खंडपीठाने बीसीसीआय आणि उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनकडून या संपूर्ण प्रकरणावर उत्तर मागितले आहे. आता यावर पुढील सुनावणी १९ सप्टेंबर रोजी होणार आहे.