टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशचा संघ सध्या अमेरिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात अमेरिकेने बांगलादेशला दणका दिला आहे. हा सामना अमेरिकेने ५ गडी राखून जिंकला आहे. अमेरिकेला हा सामना जिंकून देण्यात माजी भारतीय खेळाडूने मोलाची भूमिका बजावली आहे. या विजयासह अमेरिकेने इतिहास रचला आहे.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, यजमान अमेरिकेने नाणेफेक जिंकला आणि पाहुण्या बांगलादेश संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. हे आमंत्रण स्वीकारत बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ६ गडी बाद १५३ धावा केल्या. बांगलादेश संघाकडून फलंदाजी करताना तोहिद हृदोयने ४७ चेंडूंचा सामना केला आणि ४ चौकार आणि २ षटकारांचा मदतीने ५८ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या १५३ वर पोहचवली. तर अमेरिकेकडून गोलंदाजी करताना स्टीव्हन टेलरने २ गडी बाद केले.
अमेरिकेला हा सामना जिंकण्यासाठी १५४ धावा करायच्या होत्या. हे आव्हान अमेरिकेने १९.३ षटकात पूर्ण केलं. अमेरिकेला हा सामना जिंकून देण्यात माजी भारतीय खेळाडू हरमीत सिंगने महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात तो सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला आणि १३ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३३ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याची सामनावीर म्हणून निवड केली आहे.
त्याने १९ वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यासह त्याने आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. भारतीय १९ वर्षाखालील संघाचा माजी कर्णधार उन्मुक्त चंदने देखील भारत सोडून अमेरिकेकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता.मात्र त्याला टी-२० वर्ल्डसप स्पर्धेसाठी अमेरिकेच्या संघात स्थान देण्यात आलेलं नाही. हा विजय अमेरिकेसाठी ऐतिहासिक ठरला आहे. कारण या संघाने पहिल्यांदाच आयसीसीच्या फुल मेंबर संघाविरुद्ध खेळताना विजय मिळवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.