भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुलने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मोठा रेकॉर्ड केला आहे. केएल राहुलने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघासाठी सर्वात वेगवान शतक झळकावले आहे. या विक्रमात त्याने कर्णधार रोहित शर्माला मागे सोडलं आहे.
नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात त्याने ६२ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. या खेळी दरम्यान त्याने ११ चौकार आणि ४ षटकार मारले. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. त्याने ६३ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं होतं.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात १३१ धावांची वादळी खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने ६३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. हा विक्रम मोडत आता केएल राहुल भारतासाठी वर्ल्डकप स्पर्धेत वेगवान शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. भारतीय संघासाठी सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वीरेंद्र सेहवाग तिसऱ्या स्थानी आहे. त्याने २००७ मध्ये ८२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. तर विराट कोहलीने ८३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. (Latest sports updates)
भारतीय संघाने उभारला ४१० धावांचा डोंगर...
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० षटक अखेर ४ गडी बाद ४१० धावांचा डोंगर उभारला. ही भारतीय संघाची वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे.
भारतीय संघाकडून फलंदाजी करताना श्रेयस अय्यरने नाबाद १२८ धावांची तुफानी खेळी केली. तर केएल राहुल १०२ धावा करत माघारी परतला. या दोघांनी मिळून २०८ धावा जोडल्या. ही वर्ल्डकप स्पर्धेत चौथ्या विकेटसाठी भारतीय फलंदाजांकडून केली गेलेली सर्वात मोठी भागीदारी ठरली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.