
भारताची स्टार क्रिकेटपटू आणि उपकर्णधार स्मृती मंधानाने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करत आयसीसी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय (ICC ODI Cricketer of the Year) क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकला आहे. मंधानाने हा पुरस्कार जिंकून इतिहास घडवला आहे. मंधानाने आपल्या करिअरमध्ये दुसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकला आहे. यासह अशी कामगिरी करणारी ती जगातील दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. त्याचबरोबर स्मृती मानधना ही भारताची पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
स्मृती मंधाना हिने २०१८ मध्ये पहिल्यांदा ODI क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार जिंकला होता. आता मंधानाला 2024 सालातील ODI क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार देण्यात आला आहे. मंधाना ही भारताची पहिली महिला क्रिकेटपटू आहे जिने 4 आयसीसी पुरस्कार जिंकण्याचा विक्रम केला आहे. मंधानाने गेल्या वर्षी चमकदार कामगिरी करत 13 सामन्यांत 747 धावा केल्या होत्या.
स्मृती मंधानाची २०२४ मधील कामगिरी
२०२४ हे वर्ष मंधानासाठी खूप खास ठरले. मंधानाने गेल्या वर्षी 13 एकदिवसीय सामन्यांत एकूण 747 धावा केल्या होत्या. एका कॅलेंडर वर्षात एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मंधानाचा रेकॅार्ड आहे. ती 2024 मधील सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती.स्मृतीशिवाय, श्रीलंकेची चमारी अटापट्टू, दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोलवॉर्ट आणि ऑस्ट्रेलियाची ॲनाबेल सदरलँड सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडूच्या पुरस्काराच्या शर्यतीत होत्या, परंतु भारताच्या मंधानाने या सर्वांना मागे टाकत हे विजेतेपद पटकावण्यात यश मिळवले.
दुसऱ्यांदा जिंकला ICC ODI Cricketer चा पुरस्कार
स्मृती मंधाना ICC महिला चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. मंधानाची वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून निवड होण्याची ही दुसरी वेळ आहे. अशी कामगिरी करणारी ती जगातील दुसरी महिला फलंदाज आहे. तिच्या आधी या क्लबमध्ये न्यूझीलंडची सुझी बेट्स ही एकमेव महिला क्रिकेटपटू होती. न्यूझीलंडच्या बेट्सने 2013 आणि 2016 मध्ये हा पुरस्कार जिंकला होता.
पुरस्कार जिंकल्यानंतर स्मृतीची प्रतिक्रिया
स्मृती म्हणाली, 'मला ICC ODI क्रिकेटर ऑफ द इयरचा सन्मान दिल्याबद्दल मी ICC चे आभार मानते. गेल्या वर्ष भारतीय संघाने एकदिवसीय फॅार्मेटमध्ये चांगली कामगिरी केली. आणि मला याचा आनंद आहे की मी यामध्ये योगदान देऊ शकले. मी सर्व प्रकारच्या पाठिंब्याबद्दल प्रशिक्षक आणि माझ्या कुटुंबियांचे आभार मानते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या सहकाऱ्यांचे जे सर्व चढ-उतारांमध्ये माझ्यासोबत आहेत. मी फार पुढचा विचार करत नाही, मला फक्त सोप्या गोष्टी करायच्या आहेत आणि क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे'.
Edited By: Priyanka Mundinkeri
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.