
रोहित शर्मा आयसीसी वनडे रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर
शुभमन गिल अव्वल स्थानी कायम, बाबर आझम तिसऱ्या स्थानावर घसरला
बाबरच्या खराब फॉर्मचा फायदा रोहितला
टॉप १० मध्ये भारताचे चार खेळाडू, विराट चौथ्या स्थानी
येत्या काही दिवसांत आयसीसीची आशिया कप २०२५ ही मोठी स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा भले टी २० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. मात्र, त्याआधीच कसोटी आणि टी २० मधून निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी एकप्रकारे गुड न्यूज आहे. आयसीसीनं नुकतीच वनडे रँकिंग प्रसिद्ध केली आहे. फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी सध्याच्या क्रिकेटमधील रनमशीन शुभमन गिल आहे. तर दुसऱ्या स्थानी हिटमॅन रोहित शर्मानं झेप घेतली आहे. रोहित दुसऱ्या स्थानी येण्यामागं देखील वेगळंच कारण आहे. पाकिस्तानचा बाबर आझम याला कारणीभूत ठरलाय.
पाकिस्तानचा अनुभवी आणि नेहमीच खोऱ्यानं धावा ओढणारा फलंदाज अशी ओळख असलेला बाबर आझम याचा सूर सध्या हरवलेला आहे. बॅट आणि नशीब सध्या त्याच्यावर रुसलेले आहेत. वेस्ट इंडीजविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याची कामगिरी अत्यंत खालावली. तीन सामन्यांत त्यानं अवघ्या ५६ धावा केल्या. बाबर आझमनं केलेल्या खराब कामगिरीचा फायदा मात्र भारताच्या रोहित शर्माला झाला. रोहित शर्मा आयसीसी वनडे रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर बाबर आझम तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल आयसीसी वनडे रँकिंगमध्ये फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. त्याचे ७८४ गुण आहेत. रोहित शर्मा ७५६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. हे दोन्ही खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अखेरचा सामना एकत्रित खेळले होते. या स्पर्धेत शुभमन गिल यानं ५ सामन्यांत ४७ च्या सरासरीने १८८ धावा केल्या होत्या. तर रोहित शर्मा यानं ३६ च्या सरासरीने १८० धावा केल्या होत्या.
वनडे रँकिंगमध्ये पाकिस्तानच्या बाबर आझमची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्याचे ७५१ गुण आहेत. तर चौथ्या स्थानी विराट कोहली आहे. त्याचे गुण ७३६ आहेत. तर या यादीत अव्वल दहा जणांच्या यादीत श्रेयस अय्यर देखील आहे. तो ७०४ गुणांसह आठव्या स्थानी आहे. आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये अव्वल दहा फलंदाजांमध्ये एकट्या भारतीय संघाचे चार फलंदाज आहेत.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधीच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. याआधी दोघांनी टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही संन्यास घेतला आहे. आता हे दोघे केवळ वनडेमध्ये खेळणार आहेत. भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. ही मालिका ऑक्टोबरमध्ये होईल. त्यात हे दोघेही खेळाडू एकत्र खेळताना दिसण्याची शक्यता आहे. हे दोघेही दिग्गज खेळाडू एकत्र खेळताना बघण्यासाठी भारतीय क्रिकेटचे चाहते आतुर आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.