हैदराबाद कसोटीत भारतीय संघाला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यातील सुरुवातीच्या ३ दिवस भारतीय संघाने मजबूत पकड बनवली होती. मात्र शेवटी भारतीय संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
संघातील अनुभवी गोलंदाज आर अश्विनने अप्रतिम गोलंदाजी करत ६ गडी बाद केले होते. या दमदार कामगिरीच्या बळावर तो आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी कायम आहे. दरम्यान दुसऱ्या कसोटीत आर अश्विनला मोठे रेकॉर्ड्स मोडून काढण्याची संधी असणार आहे.
आर अश्विनला हे मोठे रेकॉर्ड्स मोडण्याची संधी..
वायझॅग कसोटीत आर अश्विनला १-२ नव्हे तर, तब्बल ५ मोठे रेकॉर्ड्स मोडून काढण्याची संधी असणार आहे. सर्वात मोठा रेकॉर्ड म्हणजे, आर अश्विनने ९६ कसोटी सामन्यांमध्ये ४९६ गडी बाद केले आहेत.
तो ५०० गडी बाद करण्याचा रेकॉर्ड करण्यापासून केवळ ४ पाऊल दूर आहे. जर त्याने दुसऱ्या कसोटीत ४ गडी बाद केले तर, तो कसोटी क्रिकेटमध्ये ५०० गडी बाद करणारा भारताचा दुसरा तर जगातील नववा गोलंदाज बनू शकतो.
इंग्लंडविरुद्ध खेळताना आर अश्विनने २० कसोटी सामन्यांमध्ये ९३ गडी बाद केले आहेत. इंग्लंडविरुद्ध खेळताना सर्वाधिक गडी बाद करण्याचा रेकॉर्ड हा माजी भारतीय गोलंदाज भागवत चंद्रशेखर यांच्या नावे आहे. त्यांच्या नावे २३ कसोटी सामन्यांमध्ये ९५ गडी बाद केले होते. भागवत चंद्रशेखर यांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी आर अश्विनला केवळ ३ गडी बाद करण्याची गरज आहे. (Cricket news in marathi)
भारत- इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा रेकॉर्ड हा जेम्स अँडरसनच्या नावे आहे. जेम्स अँडरसनने या मालिकेत १३९ गडी बाद केले आहेत. आर अश्विनला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत १०० गडी बाद करण्यासाठी ७ गडी बाद करण्याची गरज आहे.
आर अश्विनने आतापर्यंत खेळलेल्या ९६ कसोटी सामन्यांमध्ये ३४ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. त्याने जर दुसऱ्या कसोटीतील दोन्ही डावात ५ गडी बाद करण्याचा कारनामा करुन दाखवला तर तो मोठ्या रेकॉर्डमध्ये अनिल कुंबळेला मागे सोडू शकतो.
भारतात खेळताना सर्वाधिक गडी बाद करण्याचा रेकॉर्ड अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे. अनिल कुंबळे यांनी ३५० गडी बाद केले आहेत. तर अश्विनने भारतात खेळताना ५६ कसोटी सामन्यांमध्ये ३४३ गडी बाद केले आहेत. हा रेकॉर्ड मोडण्यासाठी आर अश्विनला ८ गडी बाद करण्याची गरज आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.