इंग्लंडला कसोटी मालिकेत धूळ चारल्यानंतर भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. या दोन्ही संघांमधील एकमात्र कसोटी सामन्याला प्रारंभ झाला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने या सामन्याला दमदार सुरुवात केली आहे. दरम्यान गोलंदाजी करताना पूजा वस्त्राकरने 'ड्रीम बॉल' टाकला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. (Pooja Vastrakar)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान सुरुवातीलाच भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला २ मोठे धक्के दिले. सलामीवीर फलंदाज फोबी लिचफिल्डला जेमिमा रॉड्रिग्जने धावबाद करत माघारी धाडलं. त्यानंतर अवघ्या ७ धावसंख्येवर पूजा वस्त्राकरने एलिस पेरीची दांडी गुल करत तिला माघारी धाडलं.
तर झाले असे की, ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना पूजा वस्त्राकर भारतीय संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आली होती. त्यावेळी एलिस पेरी ४ धावांवर फलंदाजी करत होती.
या षटकातील चौथा चेंडू टप्पा पडताच आत आला आणि पेरीची दांडी उडवून गेला. हा चेंडू तिने फ्रंटफूटवर डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिची बॅट पुढे येणार इतक्यात चेंडू यष्टीला जाऊन धडकला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. (Latest sports updates)
असा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड..
या दोन्ही संघांमधील रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलियाचा संघ आघाडीवर आहे. आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने ४ सामने जिंकले आहेत. तर ६ सामने ड्रॉ राहिले आहेत. यादरम्यान भारतीय संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.