सिटी ऑफ लव्ह पॅरिसमध्ये पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत आतापर्यंत अनेक मोठ्या घटना घडल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यापैकीच एक मोठी घटना म्हणजे, गर्भवती असतानाही खेळाडू मैदानात उतरली आणि लढली. इजिप्तची नादा हफिझ (nada hafez) ही ७ महिन्यांची गर्भवती आहे. तरीसुद्धा ती तलवारबाजी या खेळात देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानात उतरली. याबाबत स्वतः पोस्ट शेअर करत तिने माहिती दिली.
पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेतील तिसऱ्या दिवशी इजिप्त विरुद्ध युएसए यांच्यात राऊंड ऑफ ३२ चा सामना रंगला. या सामन्यात तिने शानदार खेळ करत विजय मिळवला. मात्र पुढील फेरीत तिला साऊथ कोरियाच्या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला. मात्र पराभवानंतर तिने ७ महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती दिली.
तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करून लिहिले की, ' सोमवारी जेव्हा मी स्टेजवर आले तेव्हा मी एकटी नव्हते, आम्ही तिघे होतो. मी, माझी प्रतिस्पर्धी खेळाडू आणि या विश्वात येण्याच्या प्रतीक्षेत असलेले माझे मूल.'
नादा हफिझने पहिल्या फेरीत युएसएच्या एलिझाबेथ तार्ताकोवस्कीचा १५-१३ ने पराभव केला. मात्र पुढील फेरीत तिला साऊथ कोरियाच्या जिऑन ह्याँगकडून पराभवाचा सामना करावा लागला. या दोन्ही सामन्यांबद्दल बोलताना ती म्हणाली की, 'या दोन्ही सामन्यांमध्ये माझ्यासह माझ्या मुलाचाही तितकाच मोलाचा वाटा आहे.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.