Irani Cup, Mumbai vs Rest Of India: रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईने इराणी कप स्पर्धेतही आपला ठसा उमटवला आहे. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर पार पडलेल्या इरानी कपच्या सामन्यात मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात मुंबईने शानदार फलंदाजी करत २७ वर्षांनंतर इराणी कपची ट्रॉफी उंचावली आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचा जलवा पाहायला मिळाला आहे. यावर्षी झालेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळताना रणजी ट्रॉफी उंचावली होती. आता इराणी कप स्पर्धेतही मुंबईने जेतेपदाला गवसणी घातली आहे. मुंबईने आतापर्यंत १५ वेळेस इराणी कपची ट्रॉफी उंचावली आहे.
रेस्ट ऑफ इंडिया - ३०
मुंबई - १५
दिल्ली- २
कर्नाटक - ६
विदर्भ - २
रेल्वे - २
हैदराबाद- १
तामिळनाडू- १
हरियाणा -१
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर रेस्ट ऑफ इंडियाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईने पहिल्या डावात फलंदाजी करताना ५३७ धावांचा डोंगर उभारला. यादरम्यान सरफराज खानने सर्वाधिक २२२ धावांची खेळी केली. तर अजिंक्य रहाणे ९७ धावांवर माघारी परतला.
मुंबईने उभारलेल्या धावांचा पाठलाग करताना रेस्ट ऑफ इंडियाकडून अभिमन्यू ईश्वरनने १९१ धावांची शानदार खेळी केली. रेस्ट ऑफ इंडियाने मुंबईला मागे सोडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र हा रेस्ट ऑफ इंडियाला ४१६ धावांपर्यंत मजल मारता आली.
यासह मुंबईला पहिल्या डावात मोठी आघाडी मिळाली. इथून पुढे मुंबईला फक्त सामना पुढे शेवटपर्यंत घेऊन जायचा होता. मुंबईकडून सलामीला आलेल्या पृ्थ्वी शॉ ने ७६ धावांची खेळी करत शानदार सुरुवात करुन दिली. शेवटी तनुष कोटियनने नाबाद ११४ धावांची खेळी केली. त्याला मोहित अवस्थीने चांगली साथ दिली. दोघांनी मिळून १५० हून अधिक धावांची भागीदारी केली. पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीच्या बळावर मुंबईने हा सामना आपल्या नावावर केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.