भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यातील पहिल्या सत्रात बांगलादेच्या गोलंदाजांनी हवा केली. मात्र शेवटच्या २ सत्रात भारतीय फलंदाजांनी जोरदार पलटवार केला. पहिल्या दिवसाखेर भारताने ६ गडी बाद ३३९ धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडून रविंद्र जडेजा ८६ तर आर अश्विन १०२ धावांवर नाबाद माघारी परतला आहे.
या सामन्यात भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. आधी रोहित, मग गिल आणि त्यानंतर विराटही स्वस्तात माघारी परतला. मात्र त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत हे दोघेही संकटमोचक बनून भारतीय संघासाठी मदतीला धावले.
दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली आणि बॅकफूटवर असलेल्या भारतीय संघाला कमबॅक करुन दिलं. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गाजवणारा यशस्वी जयस्वालला या डावातही चांगली सुरुवात मिळाली होती. त्यामुळे वाटलं होतं की, तो मोठी खेळी करणार. मात्र अर्धशतक झळकावल्यानंतर ५६ धावांवर तो बाद होऊन माघारी परतला. तर रिषभ पंत ३९ धावांवर माघारी परतला.
या डावात १४४ धावांवर भारताचे ४ फलंदाज तंबूत परतले होते. त्यामुळे भारतीय संघाचा डाव पुन्हा एकदा गडगडला होता. मात्र त्यानंतर आर अश्विन आणि रविंद्र जडेजाची जोडी मैदानावर आली आणि या जोडीने सामन्याचं चित्र पालटलं. दोघांनी मिळून आधी शतकी, मग दीडशतकी आणि आता दिवसाखेर दोघेही २०० धावांची भागीदारी करण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. दिवसाखेर दोघांनी मिळून १९५ धावांची भागीदारी केली आहे. आर अश्विन १०२, तर रविंद्र जडेजा ८६ धावांवर नाबाद आहे. अश्विननंतर जडेजाही शतक झळकावण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.