India vs New Zealand 2nd Test: न्यूझीलंडने भारतात येऊन इतिहास रचला आहे. जे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका कोणालाच जमलं नव्हतं, ते न्यूझीलंडने करुन दाखवलं आहे. इंग्लंडने २०१२ मध्ये भारतीय संघाला मायादेशात खेळताना कसोटी मालिकेत पराभूत केलं होतं.
त्यानंतर कुठल्याही संघाला भारतात कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. मात्र न्यूझीलंडने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकत मालिका २-० ने जिंकली आहे. काय आहेत या पराभवाची प्रमुख कारणं? जाणून घ्या.
या सामन्यात न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. वॉशिंग्टन सुंदरच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर भारताने न्यूझीलंडचा डाव २५९ धावांवर हाणून पाडला. न्यूझीलंडला पहिल्या डावात ३०० पेक्षा कमी धावांवर रोखल्यानंतर भारताकडे मोठी आघाडी घेण्याची संधी होती.
मात्र भारतीय फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. पहिल्या डावात रविंद्र जडेजाने केलेली ३८ धावांची खेळी ही सर्वात मोठी खेळी ठरली. इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताचा पहिला डाव अवघ्या १५६ धावांवर आटोपला. यासह न्यूझीलंडने पहिल्या डावात १०३ धावांची आघाडी घेतली.
फिरकी गोलंदाजांचा सामना कसा करायचा, हे भारतीय फलंदाजांकडून शिकावं असं म्हणतात. मात्र भारताचा प्लान भारतीय फलंदाजांवरच उलटल्याचं दिसून आलं आहे. भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजी खूप चांगल्याप्रकारे खेळतात.
मात्र या सामन्यात भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजीविरुद्ध नागिण डान्स करताना दिसून आले. भारतीय फलंदाज डिफेन्स करताना गोंधळून जात होते. त्यामुळे ते मोठा फटका खेळण्याचा आणि आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होते. या प्रयत्नात त्यांना बाद व्हावं लागलं. ज्या खेळपट्टीवर अश्विन, जडेजासारख्या गोलंदाजांना फलंदाजांना बाद करण्यासाठी घाम फुटत होता. त्याच खेळपट्टीवर सँटनरने पहिल्या डावात ७ आणि दुसऱ्या डावात ६ असे १३ गडी बाद केले.
भारतीय कसोटी संघात युवा खेळाडूंना स्थान दिलं गेलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही संघातील सर्वात अनुभवी फलंदाज आहेत. त्यामुळे संघ अडचणीत असताना, रोहित आणि विराटने जबाबदारी घेऊन खेळणं अतिशय महत्वाचं होतं. मात्र हे दोघेही स्वस्तात बाद होऊन माघारी परतले.
रोहित पहिल्या डावात शून्यावर माघारी परतला. तर दुसऱ्या डावात त्याला अवघ्या ८ धावा करता आल्या. तर विराट कोहली पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात १७ धावा करत माघारी परतला. हे दोघेही टिकले असते, तर नक्कीच भारतीय संघ सामन्यात कमबॅक करु शकला असता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.