
अखेर भारताने आयसीसी वर्ल्डकप २०२३ फायनलचा बदला घेतला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
या स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर विजयासाठी २६५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या झुंजार खेळीच्या बळावर भारताने ४ गडी राखून विजय मिळवला आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. ऑस्ट्रेलियाकडून स्मिथ आणि कॅरीच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने २६४ धावांपर्यंत मजल मारली.
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २६५ धावा करायच्या होत्या. हे आव्हान भारतीय संघासाठी फार मोठं नव्हतं, पण खेळपट्टी पाहता हे आव्हान नक्कीच कठीण वाटत होतं. मात्र श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने हे आव्हान पूर्ण केलं.
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानावर आली होती. मात्र या जोडीला हवी तशी सुरुवात करुन देता आली नाही. भारताला ३० धावांवर पहिला धक्का बसला. शुभमन गिल अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. त्यानंतर रोहित शर्मानेही २८ धावांवर पॅव्हेलियनची वाट धरली.
सुरुवातीला २ विकेट्स पडल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून मोठी भागीदारी केली आणि भारतीय संघाला कमबॅक करुन दिलं. श्रेयसने ६२ चेंडूंचा सामना करत ४५ धावांची खेळी केली. अय्यर बाद झाल्यानंतर विराटने केएल राहुलसोबत मिळून डाव पुढे नेला.
मात्र त्यानंतर विराटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात विराट ८४ धावांवर बाद झाला. भारताकडून अक्षर पटेलने २७ धावांची खेळी केली. तर केएल राहुल आणि हार्दिक पंड्याने शेवटी नाबाद राहुन भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.