आयपीएल २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना २६ मे रोजी रंगणार आहे. मात्र मुंबई इंडियन्स आपला शेवटचा सामना १७ मे रोजी खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. कारण मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मुंबईचा पुढील सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि शेवटचा सामना लखनऊ सुपरजायंट्स संघाविरुद्ध रंगणार आहे. ८ गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानी असलेला मुंबईचा संघ पुढील दोन्ही सामने जिंकून १२ गुणांपर्यंत पोहचू शकतो. हे गुण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पुरेसे नाहीत. या सुमार कामगिरीसाठी कर्णधार हार्दिकवर जोरदार टिका केली जात आहे. मात्र खरंच एकटा हार्दिक पंड्या पराभवाला कारणीभूत आहे का? याचाच घेतलेला आढावा.
आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात मोठी उलथपालथ पाहायला मिळाली. गेली १० वर्ष संघाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिकवर सोपवण्यात आली. मुंबईला भविष्यातील कर्णधार हवा होता आणि हार्दिकला मुंबईत यायचं होतं.
दोन्ही समीकरणं जुळली. मुंबईने कुठलीही माहिती न देता रोहितला कर्णधार पदावरुन काढलं आणि ही जबाबदारी हार्दिकवर सोपवली. हार्दिकने गेल्या २०२२ मध्ये गुजरातला चॅम्पियन बनवलं होतं. तर दुसऱ्या हंगामात संघाला फायनलपर्यंत पोहचवलं. मात्र मुंबई इंडियन्ससाठी त्याला अशी कामगिरी करता आली नाही.
मुंबईची स्पर्धेतून एक्झिट
मुंबईने हंगामातील काही सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी ही मुंबईने सुरुवातीचे सामने गमावून दमदार कमबॅक केलं आणि फायनलही जिंकली होती. यावेळीही मुंबई असा चमत्कार करेल अशी फॅन्सला आशा होती. मात्र यावेळी नेतृत्वाची धुरा रोहितकडे नव्हे तर हार्दिककडे होती.
रोहितला कर्णधारपदावरुन काढून हार्दिकला ही जबाबदारी देणं हे मुंबईच्या फॅन्सला पटलंच नव्हतं. मुंबईच्या ताफ्यात रोहित आणि हार्दिक असे २ गट पडले असल्याच्या चर्चा देखील पाहायला मिळाल्या. याचा परिणाम खेळाडूंच्या सांघिक कामगिरीवरही पाहायला मिळाला.
आयपीएल २०२४ स्पर्धेत हार्दिक पंड्याची कामगिरी
आयपीएल २०२४ स्पर्धेत मुंबईचं नेतृत्व करत असताना हार्दिक पंड्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. कर्णधार म्हणून त्याची कामगिरी पाहिली तर मुंबई इंडियन्सने आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. यादरम्यान मुंबईला केवळ ४ सामने जिंकता आले आहेत. तर ८ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघाच्या कामगिरीला एकटा कर्णधार कारणीभूत नसतो. कारण हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना गुजरातचा संघ शानदार कामगिरी होता.
आता संघ तोच आहे, खेळाडू तेच आहेत, हेड कोच तेच आहेत. मात्र कर्णधार बदलला आहे. हार्दिक गेल्यानंतर गुजरातचा संघ सर्वात शेवटी आहे. यावरुन तुम्हाला अंदाज येईल की चूक एकट्या हार्दिकची नाही. एका संघाला, संघातील खेळाडू, टीम मॅनेजमेंट आणि मुख्य बाब म्हणजे फॅन्सच्या सपोर्टची गरज असते. मात्र होम ग्राऊंडवरही खेळतानाही हार्दिकला फॅन्सचा सपोर्ट मिळाला नाही. संपूर्ण स्टेडियम त्याच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसून आलं.
हार्दिकच्या गोलंदाजीतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १२ सामन्यांमध्ये २९.८२ च्या सरासरीने ११ गडी बाद केले आहेत. तर फलंदाजीतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर १२ सामन्यांमध्ये त्याने १९८ धावा केल्या.
संघातील टॉप ३ खेळाडूंची कामगिरी कशी?
रोहित शर्मा-
रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्स संघातील प्रमुख फलंदाज आहे. रोहितने चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात शतकी खेळी केली होती. या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यातील कामगिरी वगळली तर इतर ११ सामन्यांमध्ये त्याला लक्षवेधी कामगिरी करता आलेली नाही. जेव्हा जेव्हा संघाला त्याची गरज होती. तेव्हा तेव्हा तो स्वस्तात बाद होऊन माघारी परतला. त्याने १२ सामन्यांमध्ये ३० च्या सरासरीने ३३० धावा केल्या आहेत.
इशान किशन -
इशान किशनने आयपीएल २०२४ स्पर्धेतील १२ सामन्यांमध्ये रोहितसोबत डावाची सुरुवात केली. या १२ सामन्यांमध्ये त्याला केवळ १ अर्धशतकी खेळी करता आली. त्याने २२.१७ च्या सरासरीने २६६ धावा केल्या. इशानचा हा फ्लॉप शो देखील मुंबईचा संघ बाहेर होण्यामागचं एक प्रमुख कारण आहे.
नमन धीर-
नमन धीरला आयपीएल २०२४ स्पर्धेतून मुंबई इंडियन्स संघाकडून पदार्पण करण्याची संधी दिली गेली. त्याला गेल्या ५ सामन्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. मात्र या संधीचा त्याला पुरेपुर फायदा घेता आला नाही. ५ सामन्यांमध्ये त्याला अवघ्या २४ धावा करता आल्या.
हार्दिकची टी-२० संघात निवड
हार्दिकची ही कामगिरी पाहता, त्याला भारतीय संघात स्थान मिळणार की नाही?असा प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेला होता. मात्र त्याची या स्पर्धेसाठी निवड केली गेली असून त्याच्याकडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी त्याला अष्टपैलू खेळाडू म्हणून स्थान देण्यात आलं आहे. या स्पर्धेत तो कशी कामगिरी करणार? त्याला गोलंदाजी मिळणार का? फलंदाजीला कितव्या क्रमांकावर येणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.