
इंडियन प्रिमिएर लीग (IPL) 2008 च्या पहिल्याच हंगामात एक मोठा वाद झाला होता. त्या हंगामातील किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या १०व्या सामन्यानंतर हरभजन सिंगने एस श्रीसंतला कानाखाली मारली होती. ही घटना आयपीएलमधील सर्वात मोठ्या वादांपैकी एक होती. त्यातच आता, या दोन भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि श्रीसंत यांच्यातील भांडणाचा संपूर्ण व्हिडिओ पहिल्यांदाच समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये हरभजन सिंग श्रीसंतला थप्पड मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ आयपीएलचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी शेअर केला आहे.
हरभजन सिंगने श्रीसंतच्या कानशिलात लगावली
आयपीएलच्या २००८ च्या हंगामातील १० वा सामना किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. हरभजन सिंग मुंबई इंडियन्स संघाचा तर श्रीसंत पंजाब संघाचा भाग होता. सामना झाल्यानंतर हरभजन सिंगने एस श्रीसंतला कानाखाली मारली होती. नंतर या घटनेला 'थप्पडगेट' म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती. यानंतर, भारतीय नियामक मंडळ(BCCI) आणि अधिकृत प्रसारकांनी लाइव्ह फुजेट थांबवत त्याऐवजी जाहीरात दाखवली होती. ब्रेकनंतर कव्हरेज पुन्हा सुरु झाल्यानंतर श्रीसंत रडताना दिसत होता. जवळजवळ १७ वर्षानंतर ललित मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कच्या Beyond23 cricket पॉडकास्टमध्ये या घटनेचे फुटेज शेअर केले आहेत.
ललित मोदी यांनी शेअर केले फुटेज
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कला दिलेल्या मुलाखतीत ललित मोदी यांनी हरभजन सिंगने श्रीसंतला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ललित मोदी म्हणाले की, 'सामना संपला होता. सर्व कॅमेरे देखील बंद होते, फक्त माझा एक सिक्युरिटी कॅमेरा चालू होता. श्रीसंत आणि भज्जी यांच्यातील वाद यामध्ये कैद झाला आहे. भज्जीने श्रीसंतला बॅकहँडने मारले'. या व्हिडिओमध्ये इरफान पठाण आणि महेला जयवर्धने हस्तक्षेप करताना दिसत आहेत. या वादग्रस्त घटनेनंतर हरभजन सिंगवर ११ आयपीएल सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती.
१७ वर्षानंतरही हरभजनला या घटनेचा पश्चाताप
भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने रविचंद्रन अश्विनला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये या संपूर्ण प्रकरणाबाबत खुलासा केला होता. त्याने म्हटले होते की, 'जर मला आयुष्यात काही बदलण्याची संधी मिळाली तर मी ती चूक सुधारेन. जे काही घडले चे चुकीचे होते, मी ते करायला नको होते. मी श्रीसंतची २०० वेळा माफी मागितली आहे, मला आजही त्या घटनेबद्दल वाईट वाटते'.
या घटनेनंतर, दोघांनीही नंतर भारतीय संघासाठी एकत्र क्रिकेट खेळले. हे दोघेही २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होते. तसेच, भज्जी आणि श्रीसंत एकत्र कॉमेन्ट्री करतानाही दिसले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.