FIFA World cup : मेस्सीच्या समोरच रोनाल्डोचा जलवा, गोल डागून रचला इतिहास, पोर्तुगालचा रोमहर्षक विजय

रोनाल्डो आणि त्याचा संघ पोर्तुगालनं रोमांचक लढतीत घानाला ३-२ ने नमवून ३ गुणांसह विश्वकपमध्ये खाते उघडले.
FIFA World cup 2022, Cristiano Ronaldo-Lionel Messi/Twitter
FIFA World cup 2022, Cristiano Ronaldo-Lionel Messi/TwitterSAAM TV
Published On

FIFA World cup 2022 : आपला अखेरचा फुटबॉल विश्वचषक खेळणारा सर्वोत्तम फुटबॉलपटू लियोनल मेस्सी आणि क्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यावर स्पर्धेच्या सुरुवातीपासून सर्वाधिक लक्ष आहे. दोघांनीही स्पर्धेची जबरदस्त सुरुवात केली आहे. दोघांनीही प्रत्येकी एक गोल केला आहे. मात्र, दोघांच्याही संघांचे निकाल वेगवेगळे ठरलेत.

अर्जेंटिनाला सौदी अरबनं जोरदार धक्का दिला. दुसरीकडे, रोनाल्डो आणि त्याचा संघ पोर्तुगालनं रोमांचक लढतीत घानाला ३-२ ने नमवून ३ गुणांसह विश्वकपमध्ये खाते उघडले. सामन्यातील पाचही गोल दुसऱ्या हाफमधील २५ मिनिटांच्या आत झाले हे विशेष.

रोनाल्डोचा विश्वविक्रम

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील सर्वात अनोखं मैदान दोहाच्या स्टेडियम ९७४ वर रोनाल्डोनं ऐतिहासिक कामगिरी केली. रोनाल्डोनं ६५ व्या मिनिटाला पॅनल्टीवर डागलेल्या गोलसह ५ वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धेत गोल डागणारा पहिला पुरूष खेळाडू होण्याचा मान मिळाला. (Cristiano Ronaldo)

पहिल्या हाफमध्ये पदरी निराशा

विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी पाचव्या दिवसातील पहिले दोन सामने गोलच्या दृष्टीने काही खास ठरले नाहीत. या दोन सामन्यांत केवळ एकच गोल पाहायला मिळाला. अशात पोर्तुगाल आणि घाना यांच्यातील सामन्यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. जगातील सर्वोत्तम स्टायकरमधील एक असलेल्या रोनाल्डोकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा होती. इंग्लिश क्लब मॅंचेस्टर युनायटेडसोबतच्या वादानंतर स्वतः रोनाल्डो सर्वांची तोंडं बंद करण्याच्या इराद्याने या सामन्यात उतरला होता. (Football)

दुसरा हाफ, २५ मिनिटे, ५ गोल

पोर्तुगालनं आक्रमक होत अनेक संधी मिळवल्या. पण पहिल्या हाफमध्ये एकही संधीचं गोलमध्ये रुपांतर केले नाही. त्यामुळं पहिला हाफ ० - ० असा बरोबरीत होता. दुसऱ्या हाफमधील २० व्या मिनिटांपर्यंत हीच स्थिती होती. मात्र, त्याचवेळी मोहम्मद सलीसू याने पॅनल्टी बॉक्समध्ये रोनाल्डोला पाडलं आणि फाउल केला. रेफरीनं पोर्तुगालला पॅनल्टी दिली. रोनाल्डोने ६५ व्या मिनिटाला गोल डागत इतिहास रचला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सामन्यात रोमांच निर्माण झाला.

रोनाल्डोच्या या गोलनंतर २५ मिनिटांच्या आत ५ गोल डागण्याचा सिलसिला सुरू झाला. घानासाठी ७३ व्या मिनिटाला कर्णधार आंद्रे आयुने गोल डागून बरोबरी साधली. ७८ व्या मिनिटाला ब्रुनो फर्नांडीजजवळ जोआओ फेलिक्सनं गोल डागला. दोन मिनिटांनंतर सब्स्टीट्युट प्लेअर राफेल लियाओनं टीमला ३-१ ने आघाडी मिळवून दिली. पोर्तुगाल सहज विजयी होईल असं वाटलं होतं. पण ८९ व्या मिनिटाला घानाच्या बुखारीनं हेडरने गोल डागून आघाडी कमी केली. अखेर रोनाल्डोच्या संघानं रोमहर्षक लढतीत विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com