
Australia in Semifinal : पावसानं कृपा केल्यानं दिग्गज ऑस्ट्रेलिया संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमिफायनलमध्ये पोहोचला आहे. मात्र, आता सेमिफायनलच्या आधी 'अवकृपा' होणार असल्याची चिन्हे आहेत. कारण त्यांचा दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. तो महत्वाच्या सामन्यात खेळू शकणार नाही, अशी दाट शक्यता आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी रंगतदार अवस्थेत आली आहे. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलिया संघानं सेमिफायनलमध्ये धडक दिली आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील लाहोरमधील सामना पावसात धुतला गेला. त्यामुळं दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. त्यामुळं ऑस्ट्रेलिया संघाचा सेमिफायनलचा मार्ग मोकळा झाला. आता सेमिफायनलसारख्या अतिमहत्वाच्या सामन्याआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. संघातील दिग्गज खेळाडू मॅट शॉर्ट जायबंदी झाला आहे. तो सेमिफायनलच्या लढतीतून बाहेर होण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मॅट शॉर्ट याच्यासंदर्भात आयसीसीनं महत्वाची माहिती दिली आहे. शॉर्ट दुखापतग्रस्त झाल्याची माहिती आयसीसीनं अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान सामन्यात पावसानं व्यत्यय आणला होता. त्यापूर्वी मैदानात फिल्डिंग करताना शॉर्टला दुखापत झाली.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिली सेमिफायनल लढत ४ मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा सेमिफायनल सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच ५ मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ आपला सेमिफायनलचा सामना लाहोरमध्ये खेळू शकतो. शॉर्ट हा दुखापतग्रस्त असल्यानं त्याला या सामन्याला मुकावे लागू शकते. जर तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला नाही तर ऑस्ट्रेलियासमोर संकट उभं राहू शकतं.
शॉर्ट याने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना इंग्लंडविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. त्याने ६३ धावा केल्या होत्या. या सामन्यात तो विकेट घेऊ शकला नाही. तर अफगाणिस्तानविरुद्ध त्याला अवघ्या २० धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून तो १५ सामने खेळला असून, त्यानं २८० धावा केल्या. तर दोन विकेट घेतल्या आहेत.
दरम्यान, ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला पाच विकेटनं पराभूत केलं होतं. त्यानंतरचे दोन सामने पावसामुळं रद्द झाले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना रावळपिंडीत खेळवला जाणार होता. पण पावसामुळं तो सामना रद्द करावा लागला होता. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धचा सामनाही पावसामुळं थांबवावा लागला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.