टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि आरसीबीसीचे माजी संचालक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. वास्तविक, संजय बांगर यांचा मुलगा आर्यन याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअक केली आहे. संजय बांगर यांचा मुलगा आर्यनने त्याचा दहा महिन्यांचा हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन प्रवास शेअर केला आहे. २३ वर्षीय आर्यनने शस्त्रक्रियेच्या दहा महिन्यानंतर आता स्वतःची ओळख अनया अशी करुन दिली आहे. आर्यनने त्याचे नाव बदलून अनया असे ठेवले आहे. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यावर यूजर्सकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.
आर्यन बांगर हा देखील त्याच्या वडिलांसारखा क्रिकेटपटू आहे. तो डावखुरा फलंदाज आहे आणि इस्लाम जिमखाना या स्थानिक क्रिकेट क्लबकडून क्रिकेट खेळत असे. याशिवाय त्याने लीसेस्टरशायरमधील हिंकले क्रिकेट क्लबसाठीही खूप धावा केल्या आहेत. आर्यन सध्या इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये राहतो. तिथल्या काऊंटी क्लबसाठी तो क्रिकेटही खेळतो.
या व्हिडीओमध्ये त्याने सांगितले होते की, गेल्या 10 महिन्यांतील त्याचा प्रवास खूपच वेगळा होता. आर्यनपासून अनयामध्ये बदलल्यानंतर तो खूप आनंदी आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, माझे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मी अनेक त्याग केले. पण या खेळाशिवाय, एक प्रवास देखील आहे, जो माझ्या स्वतःच्या शोधाशी संबंधित आहे. माझा हा प्रवास सोपा नव्हता. पण, यातील विजय माझ्यासाठी इतर सर्व गोष्टींपेक्षा मोठा आहे.
आर्यनच्या इन्स्टाग्राम प्रॉफाइलनुसार, तो इंग्लंडमधील वेगवेगळ्या काउंटी क्रिकेटशी संबंधित आहे. त्याने इंग्लंडमधील काउंटी लीग सामन्यात 145 धावा केल्याची पोस्टही शेअर केली होती. मात्र, आता तो क्रिकेटऐवजी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आत्तापर्यंत त्याचे वडील संजय बांगर यांनी आपल्या मुलाच्या हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशनवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तत्पूर्वी, अनयाने इन्स्टाग्रामवर जाऊन इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ट्रान्सजेंडर व्यक्तीला महिला क्रिकेट खेळण्यास बंदी घातल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
Written By: Dhanshri Shintre.