
विराट कोहली, रोहित शर्मा २०२७ चा वर्ल्डकप खेळणार का?
क्रिकेट विश्वात सध्या दोघांचीच चर्चा
अजित आगरकरनं पहिल्यांदाच दिलं उत्तर
वनडे वर्ल्डकपला अद्याप २ वर्षे आहेत. पण या स्पर्धेची चर्चा आतापासूनच सुरू आहे. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे ही स्पर्धा खेळतील का? असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. जगातील दोन दिग्गज फलंदाज आणि प्रसिद्धीच्या बाबतीत शिखरावर असलेल्या विराट आणि रोहितबाबत चर्चा आणि अफवा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. विशेष म्हणजे या दोघांमुळं भारताचा ऑस्ट्रेलिया दौराही जबरदस्त चर्चेत आहे. या दौऱ्यासाठी दोघांची निवड म्हणजे एकप्रकारे ट्रायल आहे, असं आता बोललं जात आहे. या दोघांनी चांगला खेळ केला नाही तर, त्यांचं क्रिकेट करिअर संपेल का? असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाय. विराट आणि रोहितबाबत आता बीसीसीआय निवड समिती प्रमुख अजित आगरकर पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलला आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघे २०२७ मध्ये वर्ल्डकप स्पर्धा खेळणार का, असा सवाल एका वृत्तवाहिनीच्या इव्हेंटमध्ये अजित आगरकरला विचारण्यात आला. त्यावर सुरुवातीला उत्तर देण्यास आगरकर यानं टाळलं, पण नंतर तो स्पष्टपणे बोलला. आमचं लक्ष कुणा एक-दोन खेळाडूंवर नाही, तर संघातील सर्व खेळाडूंच्या कामगिरीवर आहे, असे तो म्हणाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेतील दोघांच्या कामगिरीवरून त्यांच्या वर्ल्डकप स्पर्धेतील समावेशाबाबत निर्णय होऊ शकतो का, अशी विचारणाही या कार्यक्रमात आगरकरला करण्यात आली. त्यावर आगरकरनं स्पष्ट शब्दांत नकार दिला. या दोन्ही दिग्गज फलंदाजांना काहीही सिद्ध करण्याची आवश्यकता नाही, असं तो म्हणाला.
रोहित आणि विराटने क्रिकेटमध्ये खूप काही मिळवलं आहे. एका मालिकेतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही. हा मूर्खपणा असेल. एकाची सरासरी ५० पेक्षा जास्त आहे आणि एक तर ५० च्या जवळपास आहे. तुम्ही त्यांचा प्रत्येक सामना हा ट्रायल म्हणून पाहू शकत नाही, असंही आगरकर म्हणाला.
२०२७ च्या वर्ल्डकपला अजून अवकाश आहे. दोघेही बऱ्याच कालावधीनंतर क्रिकेट खेळणार आहेत. या दोघांनी जवळपास सगळंच मिळवलं आहे. त्यामुळे ते या मालिकेत धावा करणार नाहीत, तर त्यांची निवड होणार नाही किंवा त्यांनी तीन शतके लगावली तर, ते २०२७ चा वर्ल्डकप खेळणार अशातला भाग नाही, असंही आगरकर म्हणाला.
आगरकरच्या या वक्तव्यानंतर क्रीडा वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. एक-दोन सामन्यांतील अपयशानं रोहित आणि विराटच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट होऊ शकत नाही, असंही म्हटलं जात आहे. दुसरीकडं आगरकर माध्यमांसमोर काहीही बोलला तरी, दोघेही खेळाडू क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत. त्यामुळे दोन्ही दिग्गज खेळाडूंसाठी प्रत्येक सामना हा कसोटीसारखाच असेल, यात दुमत नाही, अशा प्रतिक्रियाही क्रिकेट वर्तुळातून व्यक्त केल्या जात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.