''बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी (India Alliance) मध्ये सामील होऊ शकतात. त्यांच्यासाठी इंडिया आघाडीचे दरवाजे उघडे आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपविरुद्धच्या लढाईत उतरायचे आहे की, नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे'', असं उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे म्हणाले आहेत.
अविनाश पांडे म्हणाले की, इंडिया आघाडीची इच्छा होती की, मायावती या देखील त्यात सामील व्हाव्यात. मात्र मायावतींनी आधीच लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. पांडे म्हणाले की, काँग्रेस मनापासून समाजवादी पक्षासोबत आहे. आम्हाला विश्वास आहे की लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष लवकरच जागावाटपाबाबत सहमती दर्शवतील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अविनाश पांडे म्हणाले की, सपा-काँग्रेस आघाडी सोबत इतर लहान पक्षांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही सर्वांशी बोलत आहोत. या महिन्याच्या अखेरीस सर्व प्रश्न सुटेल. अविनाश पांडे म्हणाले की, काही पक्ष कोणतीही अट न ठेवता आघाडीत सहभागी होत आहेत. तर काही पक्षांनी अटी घातल्या आहेत. त्यामुळे जागावाटप अंतिम होण्यास थोडा वेळ लागत आहे. आम्हाला आशा आहे की, आम्ही फेब्रुवारीच्या अखेरीस सर्व प्रश्न सोडवू.
चौधरी जयंत सिंह यांचा राष्ट्रीय लोकदल एनडीएमध्ये सामील झाल्याच्या प्रश्नावर अविनाश पांडे म्हणाले की, हे अत्यंत दुर्दैवी आहे. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम उत्तर प्रदेशातूनही जाईल. त्यामुळे विरोधी पक्ष नेते पुन्हा एकत्र येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांवर ते म्हणाले की, सर्वांना हेच हवे आहे, पण निर्णय प्रियंका आणि राहुल गांधी यांनाच घ्यायचा आहे. गांधी घराण्यातील सदस्याने अमेठी आणि रायबरेलीमधून निवडणूक लढवावी, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची इच्छा आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.