हरियाणात मंगळवारी मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने मोठ्या राजकीय घडामोडी झाल्याचं पाहायला मिळालं. याच्या एकदिवस आधीच पंतप्रधान मोदींनी त्यांचं कौतुक केलं होतं आणि आज त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. भाजपने ओबीसी चेहरा नायबसिंह यांना हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवडलं आहे.
हरियाणात भाजप आणि जेजेपीची युती तुटली असली तरी राज्यात अपक्षांसह भाजपचे बहुमत आहे. खट्टर यांना अचानक मुख्यमंत्रिपदावरून हटवल्यानंतर भाजपने असे का केले, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनंतर हरियाणात एक मोठा वर्ग भाजपच्या कामावर खुश नसल्याचं, विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. यातच सरकारविरोधात लोकांमध्ये वाढत चालली नाराजी कमी करण्याचा हा प्रयत्न आहे की याचे आणखी काही कारण आहे? (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मनोहर लाल खट्टर यांना भाजपने 2014 साली हरियाणाचे मुख्यमंत्री बनवले होते. यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेजेपी सरकार स्थापन झाल्यावर खट्टर पुन्हा दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र दरम्यानच्या काळात शेतकरी आंदोलन आणि इतर विविध मुद्द्यांमुळे खट्टर सरकारच्या विरोधात लाट निर्माण होऊ लागली. खट्टर नऊ वर्षांहून अधिक काळ हरियाणाचे मुख्यमंत्री होते. (Latest Marathi News)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेतृत्वाने काही महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताविरोधी लाटेवर मात करण्यासाठी खट्टर यांच्या जागी नवीन चेहरा आणण्याचा विचार केला आहे. भाजपने गुजरात आणि उत्तराखंडमध्येही असेच पाऊल उचलले होते, जिथे त्यांना नंतरच्या निवडणुकीत यश मिळाले. 2021 च्या निवडणुकीत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उत्तराखंडमध्ये तीरथ सिंह रावत यांच्या जागी नवीन चेहऱ्याला मुख्यमंत्री केलं आणि दोन्ही ठिकाणी पुन्हा सरकार स्थापन करण्यात यश मिळविले होते.
जाट आंदोलन, शेतकरी आंदोलन, राम रहीमच्या अटकेदरम्यान झालेला हिंसाचार यासह अनेक मुद्द्यांमुळे गेल्या काही वर्षांत हरियाणा चर्चेत आहे, त्यामुळे खट्टर यांच्या प्रतिमेवरही परिणाम झाला असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, 90 सदस्यीय हरियाणा विधानसभेत भाजपचे 41 आमदार आहेत. सातपैकी सहा अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे. त्याचबरोबर गोपाल कांडा यांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. अशातच हरियाणातील भाजप सरकारला जेजेपीशिवायही धोका नाही. राज्यात काँग्रेसचे 30, जेजेपीचे 10 आमदार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.