West Bengal News : पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (West Bengal Panchayat Election) मतदान सुरु असून यामध्ये हिंसाचार झाल्याची घटना समोर आली आहे. पश्चिम बंगाल राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना (clashes in west bengal election) समोर येत आहेत. मतदानादरम्यान काही ठिकाणी गोळीबार, तर काही ठिकाणी स्फोट करण्यात आला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायतीच्या ७४ हजार जागांसाठी शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरु आहे. काही ठिकाणी शांततेत मतदान सुरु आहे. तर काही ठिकाणी हिंसाचार सुरु आहे. मतदानादरम्यान, पश्चिम बंगालच्या विविध भागांमध्ये दगडफेक, गोळीबार, जाळपोळ, लुटमारीच्या आणि स्फोटांच्या घटना समोर येत आहेत. काल रात्रीपासून आतापर्यंत राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या हिंसाचारात १४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मृतांमध्ये टीएमसी, भाजप आणि सीपीएमच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे.
मतदानादरम्यान सुरु असलेल्या हिंसाचारादरम्यान अनेक ठिकाणी बॅलेट पेपर आणि बॅलेट पेपर बॉक्स जाळला जात आहे. तर काही ठिकाणी वोटिंग मशीनच पाण्यामध्ये फेकून दिली जात आहे. मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांना पळवून लावले जात आहे.
मुर्शिदाबादच्या बेलडांगा येथे काँग्रेस आणि तृणमूल यांच्यात झालेल्या वादात सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता बाबर अलीचा मृत्यू झाला. हिंसाचारानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. गोळी लागल्याने काँग्रेस कार्यकर्ता रुग्णालयात दाखल आहे. मतदान सुरू होताच कूचबिहारमधील एका मतदान केंद्राची तोडफोड करण्यात आली आणि मतपत्रिका लुटून जाळण्यात आल्या.
मुर्शिदाबादमध्ये टीएमसी कार्यकर्त्याची चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे. याच ठिकाणी स्फोट करण्यात आला होता यामध्ये देखील टीएमसी कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. कूचबिहारमध्ये चाकूने वार करत टीएमसी कार्यर्त्याची हत्या करण्यात आली. मालदा येथे टीएमसी कार्यकर्त्याच्या नातेवाईकाची हत्या करण्यात आली.
कूचबिहार येथे पोलिंग एजंटची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पूर्व बर्दवानमध्ये सीपीआयएमच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या सर्व हिंसाचारामध्ये आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. पश्चिम बंगाल पोलीस ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.