Vishwakarma Yojana: आंतरराष्ट्रीय प्रदर्शन सेंटर यशोभूमीचं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशांला संबोधित केलं. आज विश्वकर्मा यांची जंयती आहे. आजचा दिवस कारागीर आणि शिल्पकरांसाठी समर्पित आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम विश्वकर्मा कौशल सम्मान योजना लॉन्च केली. देशातील या कारागिरांसाठी विश्वकर्मा योजना एक नवीन प्रेरणा आणि ऊर्जा देणारी योजना बनेल. (Latest News)
या योजनेतून भारतातील लोकल वस्तूंना आंतरराष्ट्रीय बनवण्यासाठी विश्वकर्मा योजना महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ज्याप्रकारे शरीरात मणके महत्त्वाची असतात त्याचप्रमाणे विश्वकर्मा कर्मचारी आपल्या समाज जीवनात महत्त्वाची भूमिका निभावत असतात. कारागिरांना मदत मिळाली पाहिजे, जागतिक पातळीवर त्यांची ओळख निर्माण झाली पाहिजे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
विश्वकर्मा योजनेविषयी बोलताना मोदी म्हणाले की, जीएसटी नोंदणीकृत दुकानातून तुम्ही वस्तूंची खरेदी करावी. विशेष म्हणजे या वस्तू मेड इन इंडिया हव्यात. या योजनेच्या अंतर्गत सरकार व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही हमीशिवाय कर्ज देईल. या कर्जाची मर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत असेल. या कर्जाचे व्याजही कमी असेल. वस्तू बनवण्यासाठी लागणारे साहित्य घेतल्यानंतर एक लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल. या कर्जाची परतफेड केल्यानंतर दोन लाख रुपयांचं पुन्हा कर्ज दिले जाईल, असं मोदी यावेळी म्हणालेत.
विश्वकर्मा योजनेच्या लॉन्चिगवेळी देशातील ७० ठिकाणी ७० मंत्री उपस्थित होते. या योजनेच्या लॉन्चिगवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह -अहमदाबाद, राजनाथ सिंह-लखनौ, महेंद्र नाथ पांडे- वाराणसी, स्मृती इरानी- झाँसी, गजेंद्र सिंह शेखावत- चेन्नई, भूपेंद्र यादव-जयपूर, नरेंद्र सिंह तोमर- भोपाल, एस जयशंकर- तिरुवनतंपुरम तसेच नितीन गडकरी- नागपूर, अश्विनी वैष्णव भुवनेश्वर आणि अनुराग ठाकूर- शिमला येथे हे मंत्री उपस्थित होते.
काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना
या योजनेचे नाव प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान योजना असे आहे. या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून या कारागिरांना प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आलाय. प्रशिक्षण दरम्यान प्रत्येक दिवसासाठी ५०० रुपये भत्ता सरकारकडून दिला जाईल. तसेच आधुनिक साहित्यांसाठी १५ हजार रुपयेसुद्धा कारागिरांना दिले जातील. वस्तूंच्या ब्रॉंडिगसाठी सरकार मदत करेल.
शासनाच्या या योजनेमुळे छोटे व्यापारी उद्योजक यांना आपल्या उद्योग व्यवसायात वाढ करता येईल. यामुळे त्यांना आपल्या आर्थिक स्थितीमध्ये देखील सुधारणा करता येईल. या योजनेचा लाभ लोहार, कुंभार,चांभार,धोबी,गवंडी,माळी,मिस्त्री,विणकर,मुर्तीकार, शिल्पकार इत्यादी कौशल्य आधारित काम करणाऱ्या कारागिरांना होईल. या योजनेतून मिळणाऱ्या कर्जासाठी फक्त ५ टक्के व्याज दर आकरला जाईल.
कौशल्य अभ्यासक्रम:
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत अधिक कौशल्ये कशी विकसित करता आली पाहिजेत यासाठी पारंपारिक कामगारांना नवीन प्रकारची उपकरणे आणि डिझाइनची माहिती दिली जाईल. या योजनेंतर्गत पारंपारिक कामगारांना आधुनिक उपकरणे खरेदीसाठीही आर्थिक मदत केली जाणार आहे. योजनेअंतर्गत दोन प्रकारचे कौशल्य विकास अभ्यासक्रम शिकवले जातील. मूलभूत आणि प्रगत असे दोन अभ्यासक्रम शिकवले जातील. दरम्यान प्रशिक्षण घेत असताना विद्यावेतन देखील दिले जाणार आहे. प्रत्येक दिवसासाठी ५०० रुपयेस्टायपेंड मिळेल.
योजनेसाठी कसा कराल अर्ज
योजनेचा लाभ घेण्यासाठी, गावांच्या सामायिक सेवा केंद्रात नोंदणी केली जाईल. तीन स्तरांनंतर अंतिम निवड केली जाईल. विश्वकर्मा योजनेत राज्य सरकार मदत करतील. पण सर्व खर्च केंद्र सरकार करणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.