पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी अहमदाबाद येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आग्रा आणि वाराणसीदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेनच्या मार्गावर असणाऱ्या इटावा स्टेशनवर राजकीय नेत्यांनी वंदे भारत ट्रेनचे स्वागत केले. भाजपच्या नेत्यांनी इटावा स्टेशनवर वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पण यावेळी मोठी दुर्घटना घडली. हिरवा झेंडा दाखवत असताना भाजपच्या आमदार सरिता भदौरिया या अचानक रूळावर पडल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे.
उत्तर प्रदेशातील इटावा येथील भाजपच्या आमदार सरिता भदौरिया वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत असताना रेल्वे रुळावर पडल्या. पण घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी कशी तरी ट्रेन थांबवून त्यांचे प्राण वाचवले. आग्रा-वाराणसी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी भाजपच्या नेत्यांची चढाओढ सुरू होती. यावेळी हिरवा झेंडा दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये सरिता भदौरिया रेल्वे रुळावर पडल्या. सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास वंदे भारत एक्स्प्रेस इटावा स्टेशनवर आली असता ही घटना घडली. ही ट्रेन पाहण्यासाठी स्टेशनवर मोठी गर्दी करण्यात आली होती.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ६१ वर्षीय भाजप आमदार सरिता भदौरिया अनेक लोकांसह प्लॅटफॉर्मवर उभ्या आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा घेऊन उभ्या होत्या. ट्रेनच्या लोको पायलटने ट्रेन सुरू करण्यासाठी हॉर्न वाजवताच सरिता भदौरिया हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पुढे आल्या. तेव्हा गर्दीच्या धक्क्याने त्या ट्रेनच्या समोर रूळावर जोरात पडल्या.
सरिता भदौरिया रेल्वे रुळावर पडल्यानंतर गोंधळ उडाला. घटनास्थळी उपस्थित नेते आणि इतर लोकांनी लगेच लोको पायलटला इशारा करून ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला. लोकांकडून सिग्नल मिळताच चालकाने गाडी थांबवली आणि मोठा अपघात टळला. यानंतर सर्वांनी भाजप आमदाराला रुळावरून उचलले आणि प्लॅटफॉर्मवर घेतलं. या घटनेमध्ये भाजप आमदार किरकोळ जखमी झाल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.