

उत्तर प्रदेशातील योगी सरकारने २०२५–२६ ऊस गाळप हंगामासाठी ऊसाच्या दरात प्रती क्विंटल ३० रुपयांनी वाढ जाहीर केलीये. नव्या दरानुसार, लवकर येणाऱ्या जातींसाठी ४०० रुपये प्रति क्विंटल आणि सामान्य जातींसाठी ३९० रुपये प्रति क्विंटल दर निश्चित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ३,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ होणार असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे ऊस विकास आणि साखर उद्योग मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी दिली.
ऊस विकास आणि साखर उद्योग मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी सांगितले की, सरकार शेतकऱ्यांच्या मेहनतीचा सन्मान करण्यासाठी कटिबद्ध आहे. ऊस उत्पादक शेतकरी हे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यांच्या उत्पादनाचे योग्य आणि वेळेवर पैसे मिळावेत, ही आमची बांधिलकी आहे'.
चौधरी यांनी पुढे सांगितले की, योगी सरकारने आतापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकूण २,९०,२२५ कोटीं रुपयांचे लाभ दिले आहेत. जे २००७ ते २०१७ या कालावधीत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष शासनकाळात वितरित झालेल्या १,४७,३४६ कोटी रुपयांपेक्षा १,४२,८७९ कोटी रुपये अधिक आहे. या निर्णयातून शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याची आणि राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्याची सरकारची अढळ बांधिलकी स्पष्ट होते'.
चौधरी पुढे म्हणाले, “उत्तर प्रदेशात सध्या १२२ साखर कारखाने कार्यरत आहेत, ज्यामुळे राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मागील शासनकाळात २१ साखर कारखाने अत्यंत कमी दरात विकले गेले होते, मात्र योगी सरकारच्या धोरणांमुळे साखर उद्योगात १२,००० कोटी रुपयांची नव्या गुंतवणुकीची नोंद झाली आहे.
'गेल्या आठ वर्षांत चार नवीन साखर कारखाने स्थापन झाले, सहा बंद कारखान्यांना पुन्हा सुरू करण्यात आले आणि ४२ कारखान्यांची ऊस गाळप क्षमता वाढवण्यात आली. यामुळे आठ मोठ्या नवीन कारखान्यांच्या बरोबरीची वाढ झाली आहे. याशिवाय, दोन साखर कारखान्यांमध्ये सीबीजी प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यामुळे या क्षेत्रात पर्यायी ऊर्जानिर्मितीला चालना मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.