नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पदभार स्वीकारला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर चार दिवसांनी रविवारी 72 मंत्र्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. यातच एक महत्त्वाचा प्रश्न अजूनही शिल्लक आहे, तो म्हणजे लोकसभा अध्यक्षपद कोणाला मिळणार?
या निवडणुकीत किंगमेकर म्हणून उदयास आलेल्या टीडीपी आणि जेडीयू या दोन्ही पक्षांना हे महत्त्वाचं पद हवं आहे, अशी चर्चा आहे. पण भाजपशी संबंधित सूत्रांनी सांगितलं आहे की, भाजप पक्ष यावर कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास तयार नाही.
संविधानानुसार, नवीन लोकसभेची पहिली बैठक होण्यापूर्वी लगेचच सभापतींचे पद रिक्त होते. राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले प्रोटेम स्पीकर नवीन खासदारांना पदाची शपथ देतात. यानंतर लोकसभेच्या अध्यक्षाची निवड बहुमताने केली जाते.
लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड होण्यासाठी कोणतेही विशिष्ट निकष नसले तरी त्यासाठी राज्यघटना आणि संसदीय नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. गेल्या दोन लोकसभेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते आणि पक्षाने अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि ओम बिर्ला यांच्यावर ही जबाबदारी दिली होती.
लोकसभा अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे. लोकसभा अध्यक्षपद हे विशेष आहे. त्यांची संसदेतील भूमिका निर्णायक असते. एन चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना संरक्षक कवच म्हणून सभापतीपद हवे आहे, असं बोललं जातं. गेल्या काही वर्षांत सत्ताधारी एनडीएच्या अनेक पक्षांसोबत भाजपचे वाद झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर अनेक पक्षांतर्गत फूटही पडली आणि अगदी सरकारेही पडली. यातच अनेक खासदारांनी आपला पक्ष सोडत दुसऱ्या पक्षात प्रवेश देखील केला आहे. अशा प्रकरणांमध्ये पक्षांतर विरोधी कायदा लागू होतो. हा कायदा सभागृहाच्या अध्यक्षांना बरेच अधिकार देतो.
या कायद्यानुसार, सदस्यांना पक्षांतराच्या कारणास्तव अपात्र ठरवण्यासंबंधीच्या बाबींवर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार सभागृहाच्या अध्यक्षांना आहे. नितीश कुमार यांनी यापूर्वीही भाजपवर त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही बंडखोर मनस्थितीत वावरायचे नाही आणि अशातच त्यांना संरक्षक कवच म्हणून सभापतीपद हवे आहे. मात्र भाजप यावर तडजोड करण्यास तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशातच लोकसभेचे अध्यक्षपद कोणाला मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.