रतन टाटांचा केवळ माणसांवरच नाही तर मुक्या प्राण्यावरही प्रचंड जीव होता. त्यांचं श्वानप्रेम सर्वश्रुत होतं. याची साक्ष पटवून देणारा एक प्रसंग 6 वर्षांपूर्वी घडला आणि प्रत्यक्ष ब्रिटिश राजघराणंही टाटांच्या या स्वभावामुळे प्रभावित झालं होतं. कसं ते पाहूयात...
रतन टाटांचं श्वानावर प्रचंड प्रेम होतं. त्यांच्या याच श्वान प्रेमाचा अनुभव थेट ब्रिटिश राजघराण्यालाही आला. हा प्रसंग 6 वर्षांपूर्वीचा म्हणजेच 2018 सालचा. 6 फेब्रुवारी 2018 रोजी ब्रिटनच्या बकिंगहम पॅलेसमध्ये पुरस्कार सोहळा होणार होता. ब्रिटिश राजघराण्यानं रतन टाटांचा सन्मान करण्यासाठी जंगी सोहळ्याचं आयोजन केलं होतं. प्रत्यक्ष राजघराण्याकडूनच पुरस्कार प्रदान केला जाणार होता. त्यामुळे कार्यक्रमाचं आयोजन, निमंत्रितांची सोय आणि इतर सर्व बाबी तशाच जंगी होत्या.
सारं काही ठरलं होतं. रतन टाटांना थेट प्रिन्स चार्ल्स तृतीय यांच्या हस्ते त्यांच्या समाजकार्यासाठी जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार होता. मात्र टाटांनी या पुरस्कार सोहळ्याला येण्यास चक्क नकार दिला. त्याचं कारण होतं टाटांचे श्वान... टँगो आणि टिटो या दोन श्वानांपैकी एक प्रचंड आजारी पडला होता. त्यामुळे आपण पुरस्कार सोहळ्याला येऊ शकत नाही, असं त्यांनी कळवलं. टाटांना त्यांच्या आवडत्या टँगो आणि टिटोसोबत थांबायचं होतं. नव्हे, तेव्हा तेच त्यांच्यासाठी सर्वात प्राधान्याचं होतं.
रतन टाटा यांनी मुंबईत श्वानांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू केलं. पण त्यांच्या लाडक्या गोवा श्वानाची गोष्टच निराळी होती. त्या श्वानालाही आज रतन टाटांच्या अंत्यदर्शनासाठी टॅक्सीने आणण्यात आलेलं होतं. मागे एकदा टाटांनी इन्स्टाग्रावर त्यांच्या लाडक्या गोवा श्वानासोबतचा फोटो शेअर केला होता. ''गोवा माझा ऑफिस पार्टनर'' असं त्यांनी श्वानांसोबतच्या आनंदी क्षणांबद्दल लिहिलं होतं.
रतन टाटा यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सोमवारपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र काळ जिंकला आणि रतन टाटांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. गुरुवारी वरळीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडत आहेत. त्यांच्या खास गोवा श्वानाला त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आणण्यात आलं होतं. त्यानंतर गोवा श्वानाने आपल्या प्रेमळ मालकाचं अंत्यदर्शन घेतलं. हा अत्यंत भावुक क्षण कॅमेऱ्यांत कैद झाला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.