Delhi Wrestlers Protest: दिल्लीतल्या जंतर-मंतर येथे सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाविरोधात (Wrestlers Protest) पोलिसांनी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवरुन नव्या संसद भवनाच्या दिशेने (new parliament building) मोर्चा घेऊन जाणाऱ्या कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं.
पोलीस बळाचा वापर करुन या कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. ऐवढंच नाही तर पोलिसांनी जंतर-मंतरवरील त्यांचे आंदोलनाचे तंबू, खुर्च्या हटवण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांच्या (Delhi Police) या कारवाईविरोधात काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Congress Leader Rahul Gandhi) संतप्त झाले आहेत.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कुस्तीपटूंवर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी कुस्तीपटुंविरोधातील कारवाईचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. 'राज्याभिषेक झाला 'अहंकारी राजा' रस्त्यावर उतरून जनतेचा आवाज चिरडत आहे!', अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे.
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी कुस्तीपटुंना समर्थन करत ट्वीट केले होते. त्यांनी या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'खेळाडूंच्या छातीवरची पदके ही आपल्या देशाची शान आहे. त्या पदकांसह खेळाडूंच्या मेहनतीमुळे देशाचा मान वाढतो. भाजप सरकारचा अहंकार इतका वाढला आहे की सरकार निर्दयीपणे आपल्या महिला खेळाडूंचा आवाज बुटाखाली पायदळी तुडवत आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे, सरकारचा मग्रूर आणि हा अन्याय संपूर्ण देश पाहत आहे.'
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाचा आरोप करत कुस्तीपटुंनी 23 एप्रिलपासून जंतर-मंतरवर आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला. तरी देखील त्यांना न्याय मिळाला नाही. ब्रिजभूषण यांच्याविरोधातील आंदोलनानंतर आज कुस्तीपटुंनी जंतर-मंतर ते नव्या संसद भवनापर्यंत शांतीपूर्ण मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. या सर्व कुस्तीपटुंनी संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढल्यानंतर पोलिसांनी त्यांना अडवले.
त्यानंतर या कुस्तीपटुंनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेडिंग ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांशी झालेल्या चकमकीत फोगट बहिणी जमिनीवर पडल्या. एवढेच नाही तर पोलिसांनी साक्षी मलिकसह बजरंग पुनिया, विनेश फोगट यांना ताब्यात घेतले. यामुळे सध्या जंतर-मंतर परिसरामध्ये गोंधळाचे वातावरण आहे. कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या खुर्च्या, तंबू आणि इतर सामान जंतरमंतरवरून हटवण्यात येत आहे. पोलिसांनी रोखल्यानंतर कुस्तीपटू केरळ हाऊसजवळ ठिय्या मांडून बसले आहेत. येथून संसद भवन हाकेच्या अंतरावर आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.