हे कधी थांबणार? निर्भया, कठुआ आता कोलकाता, या 5 रेप-मर्डर प्रकरणाने संपूर्ण देश हादरला

कोलकातामधील रुग्णालयात डॉक्टर महिलेवर सामूहिक अत्याचार करुन हत्या करण्यात आली. याप्रकरणामुळे देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. निर्भया प्रकरणावेळी जो लोकांच्या मनात राग होता, तसाच राग आणि संताप आजही देशभरात व्यक्त करण्यात येतोय. बलात्कार करुन हत्या केल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. प्रत्येकवर्षी अशा घटना समोर येतात.
Crime News
Crime NewsSaam Tv
Published On

कोलकात्यामध्ये डॉक्टर महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. त्यानंतर क्रूरतेने तिची हत्या करण्यात आली. आर.जी.कर मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये त्या दिवशी जे काही घडले, ते एका नकोशा यादीचा भाग बनलाय, ज्याच्या नुसत्या उल्लेखानेच आपण हादरतो. कठुआमध्ये आठ वर्षांची मुलगी असो, हैदराबादमध्ये डॉक्टर किंवा एक्स्प्रेसवेवर आईसमोर १४ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार... ही नकोशी यादी खूप मोठी आहे. यातील अनेक प्रकरणांवर सिनेमा, वेबसीरिज आले. पण या यादीचा अंत अद्याप झालाच नाही. यातील प्रत्येक वेदनेची कथा आहे, जी वाचून आपल्यालाच थरकाप उडवतो. विचार करा जिच्यासोबत क्रूरता झाली तिला काय वेदना झाल्या असतील, काय वाटले असेल. याचा आपण विचारही करु शकत नाही.

कोलकाता रेप-मर्डर प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झालाच, पण तो असा डाग लागलाय की जो कधीच पुसला जाऊ शकत नाही. डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी घेऊन घरातून निघालेली रुग्णालयातच समजकंटकांची शिकार बनली, ते रुग्णालयात तिच्यासाठी मंदिरापेक्षा कमी नव्हते. धक्कादायक म्हणजे, सुरूवातीला याप्रकरणाला आत्महत्येचे स्वरुप द्यायचा प्रयत्न केला. यामध्ये मेडिकल सुपरिटेंडेंट असो अथवा कोलकाता पोलीस, सर्वांनी या भयंकर घटनेवर पडदा टाकायचा प्रयत्न केला. आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे, पण देशात संतापाची लाट आहे, कोलकात्यामध्ये तणावाचं वातावरण आहे. निर्भया प्रकरणावेळी लोकांमध्ये जसा रोष होता, तसाच आज कोलकातामधील प्रकरणानंतर दिसत आहे. देशात क्रूर घटनांमध्ये वर्षानुवर्षे घट झालेलीच नाही, ज्यामुळे देश हादरला. प्रत्येक वेळी महिलांच्या सुरक्षेचे दावे केले जात होते, पण ते फक्त दावेच राहिले.

Crime News
Kolkata Doctor Case : कोलकाता अत्याचार प्रकरणावर भडकली आलिया भट्ट, आयुष्यमान खुरानाचाही संताप, पाहा कोण काय म्हणाले?

1- निर्भया गँगरेप :

१६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीमध्ये निर्भायासोबत जे झालं, त्यामुळे देश हादरला. २३ वर्षीय तरुणीसोबत चालत्या बसमध्ये सामूहिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनं दिल्लीसह भारतभर पडसाद उमटले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरही ही घटना चर्चेचा विषय ठरली होती. नराधमांनी तिला असंख्य वेदना दिल्या, गंजलेली लोखंडी रॉड निर्भयाच्या गुप्तांगात घुसवली. रक्ताने माखलेल्या तरुणीसोबत सहा नराधमांनी बलात्कार केला. त्या तरुणीने १३ दिवस नितांत वेदना सहन केल्या. २९ डिसेंबर रोजी सिंगापूरमधील रुग्णालयात तिचं निधन झालं. याप्रकरणी सहा आरोपींना पकडण्यात आले, त्यामध्ये एक अल्पवयीन होता. त्याला तीन महिन्याच्या शिक्षेनंतर सोडण्यात आले. एकाने आत्महत्या केली. चार जणांना फाशीची शिक्षा झाली.

2- बुलंदरशहर बलात्कार प्रकरण :

२०१६ च्या अखेरीस दिल्लीजवळच यमुना एक्स्प्रेस वेवर झालेल्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा देश हादरला. कारमध्ये असलेली आई-मुलगी शिकार झाली होती. नातेवाईकांकडे तेराव्याला जाणाऱ्या माय-लेकींच्या गाडीवर दगडे मारत एक्स्प्रेसवर रोखलं. त्यानंतर शेतात नेऊन १४ वर्षांच्या मुलीवर आईसमोर बलात्कार केला. त्यानंतर दोघींनाही मारण्यात आले. याप्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता.

3- हैदराबाद कांड :

डिसेंबर २०१९ मध्ये हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. सामूहिक बलात्कार करुन चौघांनी तिचा मृतदेह पेटवला होता. याप्रकरणामुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. निदर्शने काढण्यात आली होती. कँडल मार्च निघाला होता.

डॉक्टर तरुणीवर बलात्कार करण्यापूर्वी आरोपींनी तिला बळजबरी मद्य पाजलं होतं. तिने मदतीसाठी याचना केली, मात्र नराधमांना पाझर फुटला नाही. किळसवाणी बाब म्हणजे तिने प्राण सोडल्यानंतर तिच्या मृतदेहासोबतही आरोपी बलात्कार करत राहिले. त्यानंतर मृतदेह पेटवला होता. 28 नोव्हेंबरला सकाळी 26 वर्षीय पीडितेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर 29 तारखेला चारही आरोपींना अटक झाली होती. या घटनेविरोधात अख्ख्या देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनी चारही आरोपींचा एनकाऊंटर केला होता, ज्याची देशभरात चर्चा झाली होती.

4- कठुआ कांड :

२०१८ जम्मू काश्मीरमधील कठुआ येथील एका 8 वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला, त्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याची भीषणता समाजासमोर आली. त्यानंतर अनेकांनी आपला संताप व्यक्त केला. अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटींनी या घटनेचा निषेध नोंदवला.

5- हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण :

१४ सप्टेंबर २०२० रोजी हाथरसमधील एका गावात २० वर्षीय तरुणीसोबत पाशवी अत्याचार करण्यात आला होता. पीडितेचा दिल्लीतील रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. ३० सप्टेंबर रोजी तिच्या गावी पोलिसांनीच तिच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीशिवाय पीडितेचा मृतदेह जाळला होता. यासाठी पोलिसांवर सर्वच स्तरांतून टीका करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी मात्र, कुटुंबीयांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा दावा केला होता. याप्रकरणामुळे देश हादरला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com